महाविकास आघाडी रिंगणात; सर्व 18 जागा लढविण्याचा निर्धार

फुले शाहू आंबेडकर
0
शहादा (जि. नंदुरबार) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व १८ जागा लढविण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या तिन्ही घटकपक्षांनी केला असून, शुक्रवारी (ता. ३१) अर्जही खरेदी करण्यात आले. 
शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. ३ एप्रिल अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर (स्व.) पी. के. अण्णा पाटील गटाची सत्ता आहे.यंदा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गट या तिन्ही गटांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची स्वतंत्र बैठक डोंगरगाव रस्त्यावरील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पार पडली
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व जागा लढविण्याचा एकमुखी निर्णय बैठकीला उपस्थित नेत्यांनी घेतला. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत निवडणूक महाविकास आघाडीतर्फे लढाविण्याचे जाहीर करून शुक्रवारी महाविकास आघाडीतर्फे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयातून सर्व १८ जागांसाठी अर्ज खरेदी करण्यात आले असून, सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.बैठकीला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नंदुरबार जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी, जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉक्टर सुरेश नाईक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव पाटील, शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, काँग्रेसचे किसान सेलचे गणेश राजे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र लोहार, शहरप्रमुख सागर चौधरी यांच्यासह महाविकास आघाडीच्या तिन्ही घटकपक्षांच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default