आजकाल अनेक जण आपल्या मित्राची पत्नीशी ओळख करून देतात. बहुतांश स्त्रियांना आपल्या पतीचे जवळचे मित्र माहिती असतात; मात्र बिहारमधल्या पूर्णियामध्ये हीच ओळख एका व्यक्तीसाठी त्रासदायक ठरली आहे. पूर्णियामध्ये राहणाऱ्या एका ट्रक ड्रायव्हरने स्वप्नातही विचार केला नसेल, की त्याचा मित्रच त्याच्या पत्नीला पळवून नेईल. पीडिताच्या पत्नीला घेऊन फरार झाल्यानंतर आरोपी मित्राने घाणेरडेपणाचा कळस गाठला. हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रकरणी समोर आलेल्या माहितीनुसार, शमशाद असं पीडित व्यक्तीचं नाव आहे. तो ट्रक चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. शमशादची गावात राहणाऱ्या फिरोजशी मैत्री होती. शमशादने फिरोजची आपल्या पत्नीशी ओळख करून दिली होती. मैत्री असल्यामुळे दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवायचे. आपल्या मित्राच्या मनात काही तरी काळंबेरं असल्याची शमशादला कल्पनाही नव्हती. फिरोजने शमशादच्या पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न केला. हळूहळू दोघांमधलं संभाषण वाढलं तेव्हा फिरोजने शमशादच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली; पण शमशादच्या पत्नीने त्याला विरोध केला आणि हे प्रकरण पंचायतीपर्यंत गेलं. पंचायतीने फिरोजला शमशादच्या घरी न जाण्याची सक्त ताकीद दिली होती.
पंचायतीच्या आदेशाला न जुमानता 10 ऑक्टोबर रोजी फिरोज काही जणांसह शमशादच्या घरी गेला आणि त्याच्या पत्नीचं अपहरण केलं. तेव्हापासून तो शमशादला फोन करून पत्नीच्या बदल्यात खंडणीची मागणी करत आहे. इतकंच नाही तर फिरोज त्याला त्याच्या पत्नीचे अश्लील फोटोदेखील पाठवत आहे. शमशादने पोलिसांना सांगितलं, की फिरोजने बळजबरीने त्याच्या पत्नीला स्वत:जवळ ठेवलं आहे.
ही बातमी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ही बातमी वाचल्यानंतर काही नेटिझन्सना ‘रावडी राठौर’ या बॉलिवूड चित्रपटाची आठवण झाली आहे. त्या चित्रपटात बापजी नावाच्या गुंडाचा मुलगा असलेल्या मुन्नाने अशाच प्रकारे पोलिसाच्या पत्नीचं अपहरण केलं होतं. लोक बिहारमधल्या या घटनेला चित्रपटाशी जोडत आहेत.
एका युझरने कमेंट केली, की आता शमशादला विक्रम राठौरसारख्या पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीची गरज आहे. काही युझर्सनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली असून, तुम्ही बिहारला आणखी किती बदनाम करणार आहात, असा प्रश्न उपस्थित केला आहे. एक युझर म्हणाला, की आता कोणीही विश्वास ठेवण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही. या बातमीमुळे संवेदनशील व्यक्तींचं मन सुन्न झालं आहे.
