समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मानवमुक्तीच्या त्रिसूत्रीवर आधारित परिवर्तनाच्या विचारांचा जागतिक जयघोष आता युरोपच्या भूमीतून घुमणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची पताका प्रथमच जर्मनीत उंचावली जाणार असून, २ मे २०२६ हा दिवस सामाजिक न्यायाच्या नव्या युगाची ऐतिहासिक नांदी ठरणार आहे.
जर्मनीतील मैन्झ-कास्टेल येथे ‘ब्युर्गरहाउस कास्टेल’ या सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हा भव्य आणि बहुप्रतिक्षित कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र, पंजाब आणि दक्षिण भारतीय समाजातील आंबेडकरी विचारांचे अनुयायी, तसेच युरोपभरातील विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा साकारत आहे.
या ऐतिहासिक उपक्रमाचे नेतृत्व रितेश कडबे करत असून, नितेश गायकवाड, रुपेश जाधव, सुभाष चव्हाण आणि रवी जीलते यांसारख्या कार्यकर्त्यांची भक्कम साथ लाभत आहे. ‘आंबेडकराइट्स इंटरकल्चरल मिशन’ या नोंदणीकृत संस्थेच्या पुढाकारातून आयोजित हा कार्यक्रम केवळ उत्सव नसून, सामाजिक परिवर्तनाची ठोस चळवळ उभारण्याचा दूरदृष्टीचा प्रयत्न आहे.
या कार्यक्रमाला शुचिता किशोर, कॉन्सुलर जनरल, भारतीय वाणिज्य दूतावास, फ्रँकफर्ट प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे.
कार्यक्रमात भगवान बुद्धांच्या धम्मतत्त्वांचे पठण, सांस्कृतिक सादरीकरणे, प्रेरणादायी भाषणे आणि सामाजिक समतेच्या विचारांची मांडणी यांचा समावेश असणार आहे. सुमारे २०० हून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडण्याची अपेक्षा आहे.
परदेशात वास्तव्यास असलेल्या आंबेडकरी विद्यार्थी आणि कुटुंबांसाठी आधारव्यवस्था निर्माण करण्याचे कार्य ‘आंबेडकराइट्स इंटरकल्चरल मिशन’ सातत्याने करत असून, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी मार्गदर्शन करत आहे.
युरोपमधील विविध संघटनांच्या सहकार्याने उभारलेली ही चळवळ केवळ जयंतीपुरती मर्यादित न राहता, सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांच्या प्रसारासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे. जर्मनीतून सुरू झालेली ही ज्योत लवकरच संपूर्ण युरोपमध्ये प्रज्वलित होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
फुले-आंबेडकरी विचारांचा हा जागतिक विस्तार म्हणजे केवळ एक कार्यक्रम नाही, तर अन्यायाविरुद्धच्या लढ्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप देणारी ऐतिहासिक सुरुवात आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात मानवतेचा संदेश पोहोचवणाऱ्या या चळवळीमुळे सामाजिक समतेच्या लढ्याला नवी दिशा मिळणार, हे निश्चित!

