गेल्या काही महिन्यांपासून डोंबिवली परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांनी विशेष पथके तयार करत या चोरांचा शोध सुरू केला. या दरम्यान काही आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत ठाकुर्ली येथील म्हसोबा चौक येथे येणार असल्याची माहिती डोंबिवली रामनगर पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश सानप, बळवंत भराडे, पोलिस हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, सुनील भणगे यांनी म्हसोबा चौक येथे सापळा रचला. रात्रीच्या सुमारास सातजण या ठिकाणी संशयास्पदरित्या फिरताना या पथकाला आढळले. पोलिसांनी तत्काळ या सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या झडतीत पोलिसांना धारदार कोयता, चाकू, कटावणी, स्क्रू डायव्हर अशा घातक शस्त्रांसह मिरचीची पूड आणि एक नायलॉन दोरी आढळून आली.
या सर्वांना अटक करून तपासणीदरम्यान ते दिवसा रिक्षाचालक म्हणून वावरत रात्री मित्रांच्या मदतीने दरोडा टाकत असल्याचे स्पष्ट झाले. मागील पाच वर्षांपासून म्हणजेच २०१८ पासून ही टोळी याच परिसरात सक्रिय असून एकट्या दुकट्या प्रवाशावर धारदार हत्याराने वार करत त्यांना लुटत होते. हे सर्व जण त्याच परिसरात राहणारे असले तरी मूळचे उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि हरयाणाचे रहिवासी आहेत. तपासादरम्यान अटक आरोपींकडून एक रिक्षा, दोन बाइक, दोन महागडे मोबाइल जप्त करण्यात आल्याची माहिती एसीपी सुनील कुराडे यांनी दिली
