पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना अरविंद रामटेके (40) असं मृत पत्नीचे नाव आहे. तर आरोपी पती अरविंद माधव रामटेके (43) याला पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले आहे.
पवनी तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील अरविंद रामटेके यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील चांदोली येथील अर्चनासोबत 20 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोन वर्षांपासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने नेहमीच वाद होत होता. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणं होत होती.
शनिवारच्या दिवशी पती पत्नीचे भांडण विकोपाला गेले. दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर रात्री 8 वाजेच्या सुमारास अरविंदने रागाच्या भरात घराचा दरवाजा बंद केला आणि पत्नीच्या डोक्यात वरवंटा घातला.
हा प्रकार माहीत होताच गावकऱ्यांनी अर्चनाला उपचारासाठी भंडारा सामान्य रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मुलगा भाविक रामटेके यांच्या तक्रारीवरून अड्याळ पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पती अरविंद रामटेके याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
