नंदुरबार: पक्षातंर्गत तसेच महायुतीतील घटक पक्षांचा विरोध असतानाही नंदुरबार मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा भाजपची उमेदवारी मिळालेल्या डाॅ. हिना गावित यांच्यासमोर यावेळी प्रबळ आव्हान उभे आहे. मागील निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे के. सी. पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांची राजकारणरहित प्रतिमा आणि शिंदे गटाकडून त्यांना मिळणारी साथ, यामुळे भाजपची नौका हेलकावे खात असताना डॉ. विजयकुमार गावित यांनी सर्वसूत्रे हाती घेत मुलीच्या प्रचाराचा धुराळा उडवून दिल्याने लढतीमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
मागील दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या गडाला खिंडार पाडत डॉ. हिना गावित यांनी नंदुरबारमध्ये कमळ फुलवले. भाजप पदाधिकाऱ्यांचे श्रम, डॉ. विजयकुमार गावित यांची राजकीय ताकद आणि त्याला मोदी लाटेची मिळालेली साथ, यामुळे भाजपने १० वर्षात या मतदारसंघात आपली पाळमुळे भक्कम केली. वास्तविक नंदुरबार हा मतदारसंघ १९६२ पासून २०१४ पर्यंत काँग्रेसच्या ताब्यात होता. पण डॉ. विजयकुमार गावित यांनी काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढले. यंदा भाजपच्या डाॅ. हिना गावित यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने यावेळी धक्कातंत्राचा वापर करुन राजकीय क्षेत्रात फारसे परिचीत नसलेले गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली. वडील के. सी. पाडवी यांच्या माध्यमातून मिळालेले राजकीय पाठबळ हीच त्यांची जमेची बाजू. परंतु, त्यांना थेट महायुतीतूनच रसद मिळू लागल्याने अल्पावधीत ते लढतीत आले. शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी आणि गावित परिवार यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते गोवाल यांच्या पथ्यावरच पडले. शिंदे गटात असूनही रघुवंशी समर्थकांनी गावित परिवाराविरुद्ध उघडपणे दंड थोपटले. अशातच युतीधर्माच्या गप्पा मारणाऱ्या महायुतीतील सर्वच बड्या नेत्यांनी या वादाकडे सोईस्कर दुर्लक्ष केल्याने शिंदे गटाला जणूकाही वरिष्ठांकडूनच छुपे पाठबळ मिळत असल्याची स्थिती आहे. भाजपचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील प्रारंभी प्रचाराकडे पाठ फिरवली होती. परंतु, त्यांनी आता जोमाने प्रचार सुरु केल्याने निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. शस्त्रक्रिया झाली असतानाही प्रचारात उतरलेले भाजपचे वरिष्ठ नेते आमदार अमरिश पटेल, आमदार राजेश पाडवी, महामंत्री विजय चौधरी, स्वत: मंत्री डॉ. विजयकुमार गावित ही अनुभवी फळी मैदानात आल्याने डाॅ. हिना गावित यांना दिलासा मिळाला आहे.
विकासाचे मुद्दे दूर
प्रचारात विकासाचे मुद्दे हरविले आहेत. ३५ वर्षे आमदार. अडीच वर्षे आदिवासी मंत्री पद भोगलेले ॲड. के. सी. पाडवी यांना स्वत:च्या विधानसभा मतदारसंघाचा हवा तसा विकास करण्यात यश न आल्याने काँग्रेसने मणिपूरमधील आदिवासींवरील अत्याचार, संविधान बदल, आदिवासी आरक्षण, हे मुद्दे पुढे आणले आहेत. गावित परिवाराविषयी असलेली नाराजी, हा विषय जोडीला आहेच. भाजपच्या डॉ. हिना गावित १० वर्षात केलेली विकासाची कामे जनतेपर्यत पोहचविण्यात अपयशी ठरल्या आहेत. काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या आरोपांना उत्तर देण्यातच त्यांचा अधिक वेळ जात आहे. मणिपूर प्रश्नावरुन त्यांची अडचण होत आहे. गांधी परिवाराविषयी अजूनही सहानुभूती बाळगणारा मतदार या मतदारसंघात मोठ्या संख्येने आहे. राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेला मिळालेल्या प्रतिसादावरुन ते पुन्हा अधोरेखीत झाले आहे. प्रतिकूलतेच्या या वातावरणात डाॅ. हिना गावित यांची नजर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित सभेकडे आहे.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघांमधील बलाबल लक्षात घेतल्यास महायुती अर्थात भाजपचे पारडे जड दिसत आहे. अक्कलकुवा-अक्राणीमध्ये काँग्रेस, तळोदा-शहाद्यात भाजप, नवापूरमध्ये काँग्रेस, नंदुरबारमध्ये भाजप, शिरपूरमध्ये भाजप आणि साक्रीत शिंदे गटाला पाठिंबा देणारा अपक्ष, अशी स्थिती आहे.
त्यासोबतच राहूल गांधी यांनी जाहिर केलेली ‘राहुल (कॉंग्रेस) की गॅरंटी’ कार्ड मतदारांमध्ये पोहोचवित आहेत. कॉंग्रेसच्या जाहिरनाम्यातील मुद्दे प्रभावीपणे मांडत आहेत. त्यामुळे भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षातर्फे आपल्या नेत्यांचे गॅरंटी कार्ड वापरले जात आहे. त्यामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील जनता भाजपच्या डॉ. हिना गावित यांनी १० वर्षात केलेल्या विकासाला व मोदी की गॅरंटीला साथ देतात की.
मग कॉंग्रेसचे ॲड. गोवाल पाडवी यांच्या भविष्यातील विकासाचे व्हीजन अन् राहूल गांधी यांच्या गॅरंटीवर विश्वास दाखवितात. हे आता निकालातूनच मतदार राजा दाखवेल. मात्र या ‘काटे की टक्कर’मध्ये दोघापैकी कोणाला मतदार कल देतील याची काहीही गॅरंटी आज तरी सांगता येत नाही, असे सध्याचे चित्र आहे.
सध्याचा निवडणुकीतही भाजप व कॉंग्रेसचे उमेदवार समोरासमोर आहेत. भाजपचे खासदार म्हणून डॉ. हिना गावित असून यावेळीही त्याच उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराचे मुद्दे त्यांनी केलेली विकास कामे, जनहिताच्या योजनांची अंमलबजावणी हे जरी असले तरी त्यांच्या पक्षातर्फे ‘मोदी की गॅरंटी’ या फॅक्टरवर अधिक जोर दिला जात आहे.
मोदींनी दिलेच्या गॅरंटीच्या योजना व उपक्रमांचा जाहिरनामा फ्लॅश केला जात आहे. त्यातच खासदार म्हणून गेली दहा वर्षे नंदुरबार लोकसभेतील मतदार डॉ. हिना गावित यांच्या कामाशी ज्ञात आहेत. २०१४ ला डॉ. हिना गावित याही नवख्या उमेदवार होत्या. त्यांनी टॉप टेन खासदारांपुढे मोठे आव्हान उभे केले होते.
तसेच कॉंग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी हे निवडणुकीत नवखे आहेत. मात्र त्यांना वडिलांची राजकीय पार्श्वभूमी आहे. उच्च शिक्षित व जनतेशी संवाद साधत प्रचारात वैयक्तिक आकर्षण निर्माण करीत आहेत. त्यांच्या वडिलांनी केलेली कामे पूर्ण लोकसभा मतदारसंघासाठी नसले तरी पुढील विजयानंतरचा अजेंडा घेऊन ते तरूणाईला आकर्षित करीत आहेत.
