कर्नाटकात ‘हिजाब’वरून सुरू असलेल्या घटना अद्यापही थांबलेल्या नाहीत. कुंदापूर येथील भांडारकर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच हिजाब घालून येणाऱ्या विद्यार्थीनींना रोखलं गेल्याचं समोर आलं आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनीच या विद्यार्थीनींना प्रवेश नाकारला आहे. यावरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या पार्श्वभूमीवर टीका केली आहे.
“ तोकडे कपडे घातलेल्या किंवा फॅशनेवबल फाटकी जीन्स घालणाऱ्या मुली यांना चालत नाहीत. अंगभर कपडे घालणाऱ्या, डोक्यावरूनही हिजाब घेणाऱ्या मुलींना हे कॉलेजात बंदी घालतात. यांना अभिप्रेत असलेली संस्कृती नेमकी काय आहे?” असं आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.तसेच, “ बेटी बचाव, बेटी पढाव ”, पण जर ती मुस्लीम, “ बेटी हटाव ” ! अशा प्रकारचा अजेंडा दिसत आहे. ” असं म्हणत आव्हाड यांनी व्हिडिओ देखील ट्वीटरवर शेअर केला आहे. ज्यामध्ये हिजाब परिधान करून महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थींना प्रवेशद्वावरच अडवले जात आहे, महाविद्यालयाचे प्रवेशद्वार बंद केले जात असताना दिसत आहे.दरम्यान, कर्नाटकचे शिक्षणमंत्री बीसी नागेश यांनी याप्रकरणी वक्तव्य करताना असे कपडे घालणे अनुशासनहीन असल्याचे म्हटले आहे.
