पुणे महापालिकेच्या जम्बो करोना रुग्णालयाच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यासाठी पुणे महापालिकेत आलेल्या भाजपा नेते किरीट सोमय्यांचा मात्र पालिकेच्या पायऱ्यांवरच शिवसैनिकांनी निदर्शने करत त्यांचा रस्ता अडवला. त्यामुळे झालेल्या गोंधळात त्यांना धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे ते खाली पडले. सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून तातडीने सोमय्या यांना गाडीत बसविले. सोमय्या यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान यावरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनामधून किरीट सोमय्यांचा उल्लेख करत मराठी आणि महाराष्ट्राची बदनामी करत असल्याचा आरोप केला आहे.
रोखठोकमध्ये काय म्हटलं आहे –
“मराठीचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आपणच कसे पोसतोय हे आता रोज दिसत आहे. मराठीचा दुस्वास करणारे, महाराष्ट्रातील शाळेत मराठी सक्तीची नको यासाठी उच्च न्यायालयात लढा देणारे भाजपाचे पुढारी किरीट सोमय्या महाराष्ट्राची बदनामी आता रोजच करीत आहेत. १७० आमदारांचा पाठिंबा असलेले ‘ठाकरे’ सरकार या मराठी द्वेष्ट्यांविरुद्ध पाऊल उचलणार नसेल तर मराठी अस्मितेची नवी ठिणगी पडायला वेळ लागणार नाही,” असं संजय राऊत म्हणाले आहेत“हे सोमय्या महाराष्ट्राच्या सरकारला धमक्या देतात. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची बदनामी करतात. महाराष्ट्राविरुद्ध कारस्थाने करतात आणि हे महान कार्य करत असल्याबद्दल भाजपाच्या केंद्र सरकारने त्यांना केंद्र सरकारची खास ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली आहे. मराठीचे आणि महाराष्ट्राचे शत्रू अशा पद्धतीने भाजपचे केंद्र सरकार पोसत आहे,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
“मीडियाला सनसनाटी, खळबळजनक बातम्या हव्या असतात. सत्ताधाऱ्यांवर जो यथेच्छ चिखलफेक करील तो अशा वेळी महत्त्वाचा ठरतो. समाजमाध्यमांवर कोणा एका ‘हिंदुस्थानी भाऊ’ने दहावीच्या विद्यार्थ्यांना भडकविले व रस्त्यावर उतरविले. या मुलांना रस्त्यावर उतरण्याची चिथावणी दिली. सध्या हे महाशय अटकेत आहेत, पण या भाऊचा भाऊसाहेब करून डोक्यावर घ्यायला सध्याचा विरोधी पक्ष कमी करणार नाही,” असा टोला संजय राऊतांनी लगावला “ईडी, सीबीआयच्या सूडाच्या कारवाया भाजपला विजय मिळवून देणार नाही. गोव्यात भाजप पुन्हा येत नाही व उत्तर प्रदेशात अखिलेश यादवांचा विजयरथ पुढे चालला आहे. रॉ आणि सीबीआय इंदिरा गांधींना पराभवापासून वाचवू शकले नाही तेथे आजच्या तपास यंत्रणा काय करणार? पुन्हा भाजपचे किरीट सोमय्या तर सरळसरळ ब्लॅकमेलिंग करतात, असे त्यांचे वर्तन आहे. हे सोमय्या ईडी कार्यालयात जातात व उद्या कुणाला बोलवायचे व दम द्यायचा तो अजेंडा ठरवतात व पुन्हा ते तसे जाहीर करतात, उद्या ईडी कुणाच्या घरी पोहोचणार हे ते आधी जाहीर करतात. त्यानुसार ईडीच्या कारवाया होतात. हे घडत असल्याने मोदी व शहांच्या प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“घोटाळे फक्त महाराष्ट्रातच होत आहेत”
“सर्व प्रश्न फक्त महाराष्ट्रातच आहेत. सर्व प्रकारचे गैरव्यवहार, घोटाळे फक्त महाराष्ट्रातच होत आहेत, असा एक समज भारतीय जनता पक्षाने करून दिला आहे. संपूर्ण देशात चार कोटी बेरोजगार वाढले आहेत. पण हा भाजपासाठी प्रश्न नसून देणगी आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी गुंड आणि माफियांना उमेदवारी देत असल्याची जोरदार टीका भाजपाचे पुढारी उत्तर प्रदेशच्या प्रचार दौऱ्यात करीत आहेत. अखिलेश यादव आणि मुलायम यादव मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्यासोबत आजम खान, अतिक अहमद, मुख्तार अन्सारी दिसत होते, पण आता योगी राज्यात आपण यांना पाहिलंत का? असे विचारले जाते. भाजपाचा हा सवाल बरोबर आहे. योगी सरकारने सर्व गुंडांना आणि माफियांना मोडून काढले, पण त्याच भाजपाने गोव्यात आजम खान, मुख्तार अन्सारी मागे पडतील अशांना उमेदवारी दिली, पणजीतही भारतीय जनता पक्षात बाबुश मोन्सेरात यांना उमेदवार केले तेव्हा राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी भाजपाचे दिवंगत नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांनी बंड केले. बाबुश यांच्याकडे बलात्कारापासून सर्वच गुन्ह्यांच्या पदव्या आहेत. उत्तर प्रदेशात भाजपचे नेते ज्या चारित्र्याचे दाखले देत आहेत ते सर्व त्यांना गोव्यात येऊन बोलता येईल काय?,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे.
