रुग्णालय आग दुर्घटनेचा चौकशी अहवाल जाहीर करू -मुश्रीफ

फुले शाहू आंबेडकर
0
नगर : जिल्हा सरकारी रुग्णालयाला लागलेल्या आग दुर्घटनेचा राज्य सरकारला सादर झालेला चौकशी अहवाल जाहीर करण्यासाठी आपण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. रुग्णालयातील आगीचे नेमके कारण काय व त्यावर काय कारवाई करण्यात आली, या प्रश्नासंदर्भात त्यांनी ही माहिती दिली. पालकमंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आज, मंगळवारी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची करोना प्रतिबंधक आढावा बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ यांनी हे आश्वासन दिले. शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे सीईओ राजेंद्र क्षिरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महापालिका आयुक्त शंकर गोरे आदी उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या ५० हजार रुपयांच्या मदतीसाठी १५ हजार ३३७ अर्ज आले. त्यापैकी १० हजार ४०१ जणांना मदत देण्यात आली. ही रक्कम ४५ कोटी आहे. सरकारी पोर्टलवर मात्र ७ हजार २२२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे, याकडे लक्ष वेधले असता मुश्रीफ म्हणाले की, न्यायालयानेच याबाबत उदार धोरण ठेवण्याची सूचना केली आहे.राज्यपालांनी दिलगिरी व्यक्त करावी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य केले. रामदास स्वामी छत्रपतींचे गुरू असल्याबद्दल वाद आहे, असाच वाद ‘जेम्स लेन’ प्रकरणातही झाला होता. राज्यपाल हे जबाबदार पद आहे, त्यांनी अशी वक्तव्य करू नयेत. त्या वक्तव्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. नगर शहरातील रस्त्यांसाठी १५ कोटी नगर शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाल्याकडे लक्ष वेधले असता पालकमंत्री मुश्रीफ यांनी ही वस्तुस्थिती आहे, यासंदर्भात आपण महापालिका आयुक्तांना सूचना देऊ, असे सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नगर शहरातील रस्त्यांसाठी १५ कोटी व बाळासाहेब देशपांडे रुग्णालयासाठी ११ कोटींचा निधी उपलब्ध केल्याची माहितीही त्यांनी दिली. तनपुरे प्रकरणावर भाष्य टाळले सक्तवसुली संचालनालयाने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर केलेल्या कारवाईकडे लक्ष वेधले असता मुश्रीफ म्हणाले, आपल्याला या प्रकरणाची पुरेशी माहिती नाही, कारवाई नेमक्या कोणत्या संदर्भात झाली हे माहीत नाही. त्याची माहिती घेतो, असे सांगत भाष्य टाळले. मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही मात्र अनिल देशमुख व संजय राठोड यांचा राजीनामा घेतला गेला, या विरोधाभासाकडे लक्ष वेधले असता केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजपा सत्तेचा गैरवापर करत आहे, सत्ता गेल्यामुळे ते अस्वस्थ आहेत, भाजपचे मंत्री धुतल्या तांदळासारखे आहेत का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडी ‘फेविकॉल’ प्रमाणे भक्कम आहे, असा दावाही त्यांनी केला. ‘मुखपट्टीमुक्ती’चा निर्णय अद्याप नाही जिल्ह्यातील करोना संसर्गाचे प्रमाण आता कमी होत चालले आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाला चाचण्यांची संख्याही कमी करण्याची सूचना केली आहे. लवकरच आणखी निर्बंध शिथिल होतील. मात्र ‘मुखपट्टीमुक्ती’चा निर्णय तज्ज्ञांची समिती व मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरच होईल, असेही पालक मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default