काँग्रेस-वंचित आघाडीत कलगीतुरा ; डॉ. नितीन राऊत यांच्या टीकेमुळे वंचित आक्रमक
मंगळवार, मार्च ०८, २०२२
0
अकोला : ऊर्जामंत्री व काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांनी थेट प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केल्याने काँग्रेस आणि वंचित आघाडीमध्ये कलगीतुरा रंगला आहे. डॉ. राऊत यांच्या टीकेनंतर वंचित आघाडीने आक्रमक भूमिका घेत त्यांना मानसिक उपचाराची गरज असल्याचा प्रतिहल्ला करून मानसोपचार तज्ज्ञांकडे त्यांचे नाव नोंदवले. या सर्व प्रकरणावरून काँग्रेस व वंचित आघाडीतील संबंध आणखी ताणले गेले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये आघाडी करण्यासंदर्भात सुरू झालेल्या चर्चाना देखील या प्रकारामुळे पूर्णविराम मिळाल्याची चिन्हे आहेत.ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नुकनाच पश्चिम वऱ्हाडाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या वीज यंत्रणेचे लोकार्पण करून ऊर्जा विभागाचा आढावा घेतला. पक्षीय पातळीवर देखील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यांचे अनेक जाहीर कार्यक्रम झाले. खामगाव येथील एका कार्यक्रमात डॉ. राऊत यांनी केलेले राजकीय वक्तव्य गाजत आहे.
काँग्रेस मंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करून ते भाजपबरोबर असल्याचा आरोप केला. ‘बाबासाहेबांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना महत्त्वाची पदे द्या, माझ्या कुटुंबाची पूजा करा, त्यांना देव माना, असे कधीही म्हटले नाही. मग त्यांच्या पाया का पडता?’ असा सवाल डॉ.राऊत यांनी केला. रक्ताचे वारसदार असलेले हे नेते समाजाला चुकीच्या दिशेने नेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
डॉ. नितीन राऊत यांनी केलेली टीका व आरोप वंचित आघाडीच्या जिव्हारी लागली असून त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेसच्या मंत्र्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली. डॉ. राऊत यांची नोंद अकोल्यातील मानसोपचार डॉक्टरकडे करून वंचित युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी त्या वक्तव्याचा समाचार घेतला. घराणेशाहीबद्दल बोलताना नितीन राऊत यांना काँग्रेसच्या घराणेशाहीचा विसर कसा पडला? असा सवालही त्यांनी केला. खामगावमध्येसुद्धा भारिप-बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्या नेतृत्वात वंचित आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. नितीन राऊत यांच्या विरोधात निषेध आंदोलन केले. डॉ. नितीन राऊत यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस व वंचित आघाडीत ताणतणावाचे संबंध निर्माण झाल्याचे चित्र आहे.
आघाडीचा ‘खेळ’
विविध निवडणुकांमध्ये काँग्रेस व प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येण्यावरून चर्चेचे फड रंगतात. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी आम्ही एकत्र येण्यासाठी तयार आहोत, असे दोन्ही बाजूने सांगण्यात येते. प्रत्यक्षात मात्र आघाडी काही साकारल्या जात नाही. या माध्यमातून मतदारांमध्ये विशिष्ट संदेश पोहोचवण्यात नेते यशस्वी होतात. सुमारे गत दोन दशकांपासून आघाडीचा हा खेळ असाच सुरूच आहे
Tags
