इन्स्टाग्रामद्वारे मैत्रीच्या जाळय़ात ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आश्वी येथील तरुणाला अटक, संगमनेर पोलिसांची कारवाई

फुले शाहू आंबेडकर
0
शहरातील एका अल्पवयीन मुलीला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मैत्रीच्या जाळय़ात ओढत तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवत संगमनेर, कोपरगावमधील लॉजवर नेत तसेच आरोपीच्या घरी वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर पोलिसांनी या प्रकरणी आश्वी येथील लखन अशोक राजपुत या तरुणाला अटक केली आहे. आरोपीने शहरातील एका साडेसोळा वर्षांच्या मुलीशी इन्स्टाग्राम या समाज माध्यमातून मैत्री करत तिला आपल्या जाळय़ात ओढले. ही मुलगी आपल्या ताब्यात आल्याचा गैरफायदा घेत आरोपीने आपण राष्ट्रीयीकृत बॅकेमध्ये नोकरीस असल्याचे तिला भासवत तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखविले. लग्नाच्या आमिषाला भुललेल्या या मुलीला सोबत घेत आरोपीने गतवर्षीच्या जुलै ते जानेवारी महिन्यादरम्यान संगमनेर व कोपरगांवमधील लॉजमध्ये नेत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच आरोपीने आपल्या घरीदेखील तिच्यावर अत्याचार केल्याचे, तसेच आपले प्रेम खरे असल्याचे आरोपीला दाखविण्यासाठी त्याच्याच सांगण्यावरून स्वत:च्या मनगटावर, मांडीवर व छातीवरदेखील ब्लेडच्या साहाय्याने वार करण्यास भाग पाडल्याचे पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आपल्या कृत्याचा मुलीने बोभाटा करू नये, यासाठी तो वारंवार तिला पळून जाऊन लग्न करण्याचेदेखील आमिष दाखवत होता. अन्यथा, तिच्यासोबतचे फोटो व्हायरल करण्याची व तिच्या भावाचेही अपहरण करण्याची धमकी आरोपीने दिल्याने घाबरुन गेलेल्या या मुलीने झालेला हा प्रकार आपल्या घरी पालकांना सांगितला. पालकांनी मुलीसह पोलीस ठाणे गाठत आरोपी लखनविरोधात दिलेल्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default