ऑनलाइन पदवी अभ्यासक्रमांमध्ये आठ पट वाढ
गुरुवार, मार्च ०३, २०२२
0
पुणे : देशभरातील उच्च शिक्षण संस्थांतील ऑनलाइन पदवी अभ्यासक्रमांमध्ये गेल्या वर्षभरात जवळपास आठ पट वाढ झाली आहे. जुलै २०२० मध्ये केवळ ५० पदवी अभ्यासक्रम ऑनलाइन उपलब्ध होते, तर २०२२ मध्ये ही संख्या ३७५ अभ्यासक्रमांवर पोहोचल्याचे दिसून येत आहे. क्लास सेंट्रल या संस्थेच्या पाहणीतून ही माहिती समोर आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ऑनलाइन शिक्षणासाठी स्वयम संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळावरील अभ्यासक्रमांसाठी पूर्वी २० टक्के श्रेयांक देण्यात येत होते. मात्र २०२१ मध्ये त्यात वाढ करून स्वयमवरील अभ्यासक्रम पूर्ण केल्यास ४० टक्के श्रेयांक देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) दूरशिक्षणासाठीच्या २०२० मध्ये तयार केलेल्या नियमावलीअंतर्गत नॅकचे ३.२६ किंवा त्यापेक्षा अधिक गुणांकन असलेल्या उच्च शिक्षण संस्थांना, एनआयआरएफ क्रमवारीतील पहिल्या शंभर विद्यापीठांना ऑनलाइन पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन अभ्यासक्रमांची पाहणी करण्यात आली. यूजीसीकडून २०२० मध्ये देशभरातील सात विद्यापीठांतील ३७ अभ्यासक्रमांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. २०२१ मध्ये जवळपास २५० ऑनलाइन पदवी अभ्यासक्रम उपलब्ध होते. तर २०२२ मध्ये उपलब्ध असलेले ऑनलाइन पदवी अभ्यासक्रम जवळपास ३७५ हून अधिक आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरात ऑनलाइन पदवी अभ्यासक्रमांमध्ये आठ पट वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
वाढ कुठे, कशी?
ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केलेल्या विद्यापीठांमध्ये खासगी, अभिमत, राज्य, मुक्त विद्यापीठांचा समावेश आहे. उपलब्ध ऑनलाइन पदवी अभ्यासक्रमांमध्ये विदा विज्ञान, व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी, पर्यटन, व्यवसाय विश्लेषण अशा विविध अभ्यासक्रमांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
येत्या काळात ऑनलाइन अभ्यासक्रमांचे प्रमाण वाढत जाणार आहे. काही तासांच्या अभ्यासक्रमांपासून ते काही वर्षांच्या अभ्यासक्रमांपर्यंत वेगवेगळे अभ्यासक्रम उपलब्ध होऊ शकतील. मोठय़ा अभ्यासक्रमाचे छोटे भाग तयार करणे आणि त्यातील आवश्यक तेवढेच शिकणे याला सूक्ष्म अध्ययन म्हटले जाते. सूक्ष्म अध्ययन हा नवा प्रकारही उदयाला येऊ घातला आहे.
– डॉ. संजीव सोनावणे, अधिष्ठाता, आंतरविद्याशाखीय अभ्यास आणि संचालक, मुक्त अध्ययन प्रशाला, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
करोनामुळे..ऑनलाइन शिक्षणाची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. कारण करोना महासाथीमुळे वर्गात जाऊन ही शिकणे ही संकल्पना मोडीत निघाली. ऑनलाइन शिक्षण अधिक सोयीस्कर आहे. त्यामुळेच तंत्रस्नेही अध्ययन अध्यापन पद्धती विकसित झाल्या. मर्यादा, तरी.. ऑनलाइन शिक्षणामध्ये कौशल्य विकास, क्षमतावृद्धी, कृतिशील शिक्षण या संदर्भातील काही मर्यादा आहेत. म्हणून ऑनलाइन शिक्षणाला थोडय़ा फार प्रमाणात ऑफलाइन शिक्षणाची जोड देऊन मिश्र शिक्षण पद्धती (ब्लेंडेड एज्युकेशन) अधिक प्रभावी होऊ शकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
Tags
