महिलेचा गळा आवळून खून, जंगलात फेकला मृतदेह

फुले शाहू आंबेडकर
0

महिलेचा ओढणीने गळा आवळून खून करून तिचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत घालून उप्पलवाडीतील जंगलात नेऊन फेकण्यात आला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दीपा जुगल दास (३५, समर्थनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपा ही फेटरी येथील जैन इंटरनॅशनल शाळेच्या स्कूल बसवर मदतनीस (कंडक्टर) म्हणून कामाला होती. सकाळी सातला ती घरून निघायची आणि दुपारी २ वाजेपर्यंत ती घरी येत असे. नेहमीप्रमाणेच शनिवारी सकाळी ती घरून निघाली. त्यानंतर ती घरी आलीच नाही. तिच्या पतीने शोध घेतला परंतु, ती कुठेही सापडली नाही. रविवारी सकाळी सातच्या सुमारास तिचा पती तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आला. त्याचवेळी एका युवकाने कपिलनगर पोलिसांना फोन करून उप्पलवाडी ते कामगारनगर दरम्यान कच्च्या रस्त्यावरील एसबीटीएल अपार्टमेंटसमोर झाडाझुडुपात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. 

कुटुंबीयांनी दीपाला फोन केला असता कुशीनगर येथे सोनी नावाच्या मैत्रिणीच्या घरी असल्याचे तिने सांगितले होते. सायंकाळ झाली तरी ती घरी न आल्याने पुन्हा तिच्याशी संपर्क साधला असता तिचा फोन बंद येत होता. पोलिसांनी सोनीची विचारपूस केली असता ती भेटायला आली होती आणि लगेच निघून गेली असे तिने पोलिसांना सांगितले. त्यामुळे दीपाच्या खुनाचे रहस्य अद्याप कायम आहे.

अत्याचाराचा संशय 

दीपाचा मृतदेह प्लास्टिक पिशवीत बांधलेल्या अवस्थेत दिसून आला. तिचा गळा दुपट्टय़ाने आवळला. तिचे हातपाय बांधलेले होते. त्याचप्रमाणे तोंडात कापडी बोळा कोंबलेला होता. त्यामुळे दीपावर अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, पत्नी हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या जुगुल दासला पोलिसांनी उप्पलवाडीत नेले. त्याने मृतदेहाची ओळख पटवून पत्नी दीपा दास असल्याचे सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default