धुळे जिल्ह्यात अवैध सावकारी प्रकरणी विविध गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले असून शिरपूर शहरात प्रथमच एकाच दिवशी तब्बल 23 सावकार विरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिरपूर शहरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याने कर्जापोटी 23 सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. मात्र संशयित आरोपींनी 30 ते 40 टक्के मासिक व्याज आकारून ही अतिरिक्त पैशांची मागणी करून त्याचे आर्थिक व मानसिक शोषण केले. तसेच व्याजासह पैसे न दिल्यामुळे वेळोवेळी आरोपींनी संबंधित तक्रारदाराच्या घरात घुसून विविध बँकांचे सह्या केलेले धनादेश, दहा हजारांचा लाऊडस्पीकर, चाळीस हजाराचा लॅपटॉप आणि बाराशे रुपयांचा पॉवर बँक असा मुद्देमाल तसेच घर आणि दुकानातील सामान देखील घेऊन गेले. वेळोवेळी अश्लील शिवीगाळ करून हात-पाय तोडून टाकण्याची धमकी दिली जात असल्याचा देखील आरोप संबंधिताने केला आहे.
व्याजाची वसुली करूनही पैशांची मागणी
यासोबतच मोठ्या प्रमाणात व्याजाची वसुली करून देखील अतिरिक्त पैशांची मागणी करत असल्याने त्रस्त झालेल्या व्यावसायिकाने याप्रकरणी शिरपूर पोलिसात तक्रार दिली आहे. संशयितामध्ये मनोज गुलाबराव पाटील, उमेश संतोष पाटील, विविक शिरीष पाटील, निश्चय योगेंद्र ललवाणी, जगदीश राजेंद्र गिराषे, किरण पांडुरंग मराठे,शशिपाल चंद्रसिंह जमादार, रूद्रसिंह सुभाषसिंह जमादार, सागर वसंत माळी, चेतन रविंद्र पाटोळे, कृष्णा कुबेर पारधी, रविंद्र हिरामण खजुरे, राहुल नारायण झांंजरे, भुषण गोपाल पाटील, चेतन सुभाष माळी, अमोल गोपाल सोनवणे, अविनाश राजु बैसाणे, संजय पाटील,महेश कोळी, रोहित भोई,सागर मधुकर मराठे,सागर भाटपुरे सर्व राहणार शिरपूर, रोहित राजु राऊत रा.पुणे यांच्या समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार
पोलिसांनी जवळपास 23 अवैध सावकारांवर गुन्हा दाखल केला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये फोफावत असलेल्या अवैध सावकारी वर चाप बसविण्याच मोठं आव्हान आता धुळे पोलिसांवर असणार आहे.