महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवसेनेशी बंड करून भाजपसोबत घरोबा करून सरकार स्थापन केल्यानंतर 'राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्वप्नातही विश्वास ठेवू नका' अशा आशयाचे खरमरीत पत्र राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली आहे.
अनिल गोटे आपल्या पत्रात म्हणतात, 'आपली मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल यापूर्वीच आपले हृदयापासून अभिनंदन केले. मोगॅम्बो खुश हुआ. तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे अनुभवलेत म्हणून वडीलकीचा सल्ला देतो. मानला तर फायदाच होईल. किमान फसवणूक व नंतर पश्चाताप होणार नाही, ही एक लाख टक्के खात्री देतो. देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्यावर स्वप्नात देखील विश्वास ठेवू नका.'
देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासारख्या धनगर समाजातील कार्यकर्त्याचा छळ केला. मनाचा इतका क्षुद्र की आपल्याकडून अनवधानाने का होईना पण अन्याय झाला, हे कबुल करण्याचा प्रामाणिकपणा त्यांच्याकडे नाही. अशा राक्षसी वृत्तीच्या व्यक्तीपासून सावध रहावे, असे सल्ला गोटे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. भाजपने महाविकास सरकारच्या बहुमत चाचणीसाठी मागणी केल्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे महाविकास आघाडीचे सर्वच नेते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज आहेत.
