मुनिमाची कार रस्त्यात अडवून लुटले ४ लाख; मयुर मोरेस अटक
शुक्रवार, जुलै २९, २०२२
0
परभणी : व्यापाऱ्याची उधारीची रक्कम वसुली करून परतणाऱ्या मुनीम आणि वॉचमन यांची कार रस्त्यात दुचाकी आडवी लावून थांबवत चार लाखांची रक्कम लुटल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला असून मुनीम आणि वॉचमन ज्या कारमध्ये होते त्याच्या चालकानेच हा लुटीचा कट रचल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन रक्कम जप्त केली आहे
परळी येथील व्यापारी विष्णू देवसटवार यांचा मुनीम व वॉचमन हे गंगाखेड येथे कारने (एम एच 44 झेड 6544) वसुलीसाठी आले होते. चार लाखांची रक्कम वसूल करून गंगाखेडहून मुनीम वॉचमनसह परळीकडे परतत होते. दरम्यान, गंगाखेड-परळी रोडवरील करम पाटी येथे कारच्या समोर अचानक एक दुचाकी आडवी लावण्यात आली.
यानंतर दुचाकीवरील दोघांनी कारमधील मुनीम व वॉचमनला मारहाण केली. त्यांच्याजवळील ४ लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून घेऊन दोघे दुचाकीवरून पळून गेले. याप्रकरणी विष्णू देवसटवार यांच्या तक्रारीवरुन सोनपेठ पोलीसांनी दाेघांवर गुन्हा दाखल केला हाेता.
या गुन्ह्याचा पोलिसांनी तपास करुन कार चालक मयुर मोरे (राहणार मुंगी, ता. परळी) यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. पाेलिसांच्या चौकशीत मयूर मोरे याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर माेरे यास पाेलिसांनी अटक करुन लुटलेले ४ लाख रुपये सचिन सोळंके याच्या घरातून ताब्यात घेतले. या प्रकरणी पाेलिस आणखी एकाचा शाेध घेताहेत.

