आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. स्वप्निल अरुण दावेदार (२५) रा. घोराड असे आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, स्वप्निल दावेदार हा मागील अनेक वर्षांपासून हिंगणीजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. अडीच वर्षांपूर्वी त्याची ओळख खरांगणा गोडे येथील अल्पवयीन मुलीशी झाली.
दोघांत मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आरोपी स्वप्निल याने लग्नाचे आमिष देत मुलीला विश्वासात घेत २०२० पासून वारंवार तिचे लैंगिक शोषण केले. मात्र, अवघ्या चार महिन्यांपूर्वीच आरोपी स्वप्निल याने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. या गोष्टीची कुणकुण पीडितेला लागली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तिने थेट सेलू पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
दरम्यान, तक्रार प्राप्त होताच, सेलू पोलिसांनी स्वप्निल दावेदार याच्याविरुद्ध पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 29 ऑगस्टपर्यंत आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
