बालाबाई संजय पावरा (वय 24) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा विवाह पाच वर्षापूर्वी कुकड्या (ता.सेंधवा, जि. बडवानी) येथील संजय मुकेश पावरा याच्याशी झाला होता. उभयतांना रोहित व अशोक अशी दोन मुले आहेत. स्वयंपाकाच्या कारणावरुन संजय नेहमीच बालाबाईला मारहाण करीत होता. आठवडाभरापूर्वी तो पत्नी व मुलांना घेऊन दहिवद येथील जयवंत शिसोदे यांच्या शेतात रखवालदारीसाठी आला होता. बालाबाईचे माहेरील कुटुंबही जवळच राकेश पाटील यांच्या शिवारात राहते.
बहिण दिसली रक्तबंबाळ अवस्थेत
तिची आई सुलाबाई हिने रविवारी नातवंडांना घेऊन येण्यासाठी मुलगी नायला हिला बालाबाईकडे पाठवले. तेथे झोपडीबाहेर खाटेवर रक्तबंबाळ अवस्थेत बालाबाई पडली होती. ते दृश्य पाहून नायला आईकडे पळत गेली. माहेरील लोकांनी येऊन पाहिले असता बालाबाई निपचित पडल्याचे दिसून आले.
पतीने दिली खूनाची कबुली
घटनेबाबत थाळनेर पोलिसांना सूचित करण्यात आले. डीवायएसपी दिनेश आहेर, थाळनेरचे सहायक निरीक्षक उमेश बोरसे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाजवळच संजय पावरा बसून होता. त्याच्याजवळ रक्ताने माखलेला कुर्हाडीचा दांडा पडला होता. त्याचा मुलगा रोहित याच्याकडे चौकशी केल्यावर स्वयंपाक न केल्याच्या वादातून वडिलांनी कुर्हाडीच्या उलट्या दांड्याने बालाबाईला मारहाण केल्याचे त्याने सांगितले. संशयित संजय पावरा याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात सुलीबाई पावरा हिने दिलेल्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक निरीक्षक उमेश बोरसे तपास करीत आहेत.
