मागील काही महिन्यांपासून मोटारसायकल चोरांनी कोपरगाव शहर व तालुका परिसरातील धुमाकूळ घातला असून आज पोलिसांनी मोठ्या शिताफीने या तीन अट्टल मोटारसायकल चोरांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून 8 लाख 65 हजार किमतीच्या 13 दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरात मोटारसायकल चोरीच्या घटना घडत होत्या. याबाबतीत अनेक तक्रारी समोर येत होत्या. त्यामुळे गेले अनेक दिवसांपासून पोलीस या चोरट्यांच्या शोधात होते. अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले.
दुचाकीचोर कोपरगाव औद्योगिक वसाहत व शिंगणापूर या ठिकाणी चोरीची बुलेट विकण्यासाठी येत असल्याचे गोपनीय बातमीदारामार्फत वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना कळाले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र पुंड, पोलीस कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल कुर्हाडे या आपल्या कर्मचार्यामार्फत सापळा लावला
यात किशोर साहेबराव कापसे (वय 21), सचिन अंबादास कापसे (वय 20) दोघे राहणार तागडी, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक व तिसरा साथीदार चेतन रमण कापसे (वय 19) या 3 चोरट्यांना पोलिसांनी शिताफीने पकडून गजाआड केले. सदर चोरांकडून 8चलाख 65 हजार रुपये किमतीच्या 13 दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक तपास सुरू आहे
