जळगावच्या जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेली चाळीस वर्षीय विवाहिता जिल्हा परिषदेच्या एका पंचायत समिती कार्यालयात कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहे. या दरम्यान ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान महेंद्र सोनवणे (रा. खर्दे, ता. धरणगाव), कथित क्राईम इन्व्हेस्टीगेशन न्यूज रिपोर्टर राजेंद्र निकम (रा. वाघनगर जळगाव) यांच्यासह एक अनोळखी अशा तिघांनी महिलेला पंचायत समिती कार्यालयात येऊन आपण लाचलुचपत प्रतिबंध खात्याचे अधिकारी असल्याचा धाक दाखवत कट रचला.
व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी
महिलेच्या हातात १ हजार रुपयांची रक्कम ठेवून व्हिडिओ बनविला. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिली अन् तसे न करण्यासाठी या महिलेकडून ४५ हजाराची खंडणी वसूल केली. याशिवाय तिच्याशी अंगलट करून शरीरसुखाची मागणी करत विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दिली. तक्रारीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात शनिवारी (ता.१५) रात्री उशिरा महेंद्र सोनवणे व राजेंद्र निकम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर तपास करीत आहेत.
