इगतपुरी अवैध विषारी गावठी दारूमुळे आदिवासी समाजाची वाताहत होत असून हा समाज संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते, भरवज, निरपण या तीन गावातील युवकांनी एकत्र येत पुढाकार घेऊन गावात दारू बंद करण्यासाठी जोमाने काम सुरु केले आहे....
या सर्व युवकांनी संबंधित दारू विक्री करणाऱ्यांकडे जाऊन त्यांचे समुपदेशन करत त्यांनी दारूबंदी करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली. काल (दि.९) दिवसभरात या युवकांनी किमान २०० लिटर गावठी दारूचे ड्रम जमा करून नष्ट केले.
त्यामुळे येथून पुढे या परिसरात गावठी दारू विकली जाणार नाही असा विश्वास युवकांकडुन व्यक्त करण्यात आला आहे. तसेच परिसरातील महिलांनी युवकांच्या उपक्रमाचे स्वागत केले असून इगतपुरी पोलीसांनीही या कामात आवश्यक ते सर्व सहाय्य देण्याची भूमिका घेतली आहे.
गावठी दारूमुळे आदिवासी समाजात लाचारी आणि गुलामगिरी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसेच या गावठी दारूमुळे अनेक युवक दगावले आहेत. गावातील अनेक तरुणांचे संसार आजपर्यंत उध्वस्त झाले असून मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढून लोकशाही व्यवस्था संपुष्टात आली आहे. त्यामूळे गावातील युवकांनी दारू आणि ताडीबंदी झालीच पाहिजे असा एल्गार पुकारला.
