मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ६.३० च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर एक ऑडी कार बऱ्याच वेळापासून उभी होती. स्थानिक व्यक्तींनी गाडीत डोकावले असता काहीतरी गडबड असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे तात्काळ पनवेल तालुका पोलिसांना याची माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गाडीची काच फोडली. तेव्हा त्यात एक मृतदेह सापडला.
मृतदेह ताब्यात घेतल्यावर प्राथमिक तपासात सदर व्यक्तीचे पाकीट आणि ओळखपत्र सापडले आहे. या मृत व्यक्तीचे नाव आणि पत्ता पोलिसांच्या हाती लागला आहे. संजय कार्ले असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर यशवंत नगर तळेगाव दाभाडे येथील तो रहिवाशी असल्याचे समजले आहे.
