१५ नोव्हेंबरला आजमगढमधीस पश्चिमी गावात २० वर्षीय आराधनाचा मृतदेह स्थानिकांना विहिरीत सापडल्यानंतर ही खूनाची घटना समोर आली. पीडितेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला असून ही घटना दोन ते तीन दिवस आधी घडल्याची माहिती आजमगढचे पोलीस अधीक्षक अनुराग आर्य यांनी दिली आहे. आरोपीने त्याचे आई-वडिल, भाऊ सर्वेश आणि इतर कुटुंबियांच्या मदतीनं पीडितेच्या खूनाचा कट रचला होता. पूर्वाश्रमीच्या प्रेयसीनं दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केल्याच्या रागातून आरोपी प्रिन्सने तिचा खून केला. पीडित तरुणी आजमगढ जिल्ह्यातील इशाकपूर गावातील रहिवासी होती.
९ नोव्हेंबरला आरोपी प्रिन्सने पीडितेला मंदिरात नेले. मंदिरालगत ऊसाच्या शेतात भाऊ सर्वेशच्या मदतीने आरोपीने पीडितेचा गळा आवळून खून केला. त्यानंतर या दोघांनी तिच्या शरिराचे सहा तुकडे केले. हे तुकडे प्लास्टिक बॅगमध्ये भरुन आरोपींनी विहिरीत फेकले. पीडितेचे मुंडके जवळच असलेल्या एका तलावात फेकले. दरम्यान, या खून प्रकरणात आत्तापर्यंत एक धारदार शस्त्र, एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस पोलिसांनी जप्त केले आहे. या गुन्ह्यातील अन्य आरोपी सर्वेश, प्रमिला यादव, सुमन, राजाराम, कलावती, मंजू आणि शिला अजुनही मोकाट आहेत.
