शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी बुद्रूक गावात ग्रामपंचायतीसमोर दि. 5 रोजी मध्यरात्री विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा 14 फुटी अश्वारूढ पुतळा बसविल्यात आला. याप्रकरणी सरपंच, उपसरपंच ग्रां.प.सदस्यांसह 18 जण व इतर ग्रामस्थांवर नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिंदखेडा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी साहेबराव ओंकार जाधव (वय 50) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
त्यानुसार, दि. 5 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12 ते सकाळी 6 वाजेदरम्यान सरपंच दिलीप रामदास पाटील, उपसरपंच- गायत्री नवनाथ खैरनार, सदस्या सिमाबाई युनराज पाटील, विजय दत्तात्रय खैरनार, कल्पना देविदास कुवर, विश्वनाथ त्र्यंबक अहिरराव, लक्ष्मण मधुकर खैरनार, गोरख बंडू वाघ, मनोज पुनमचंद पाटील (अध्यक्ष), ईश्वर मोहन माळी, पुरूषोत्तम चैत्राम पाटील, प्रदिप सुरेश पाटील, दिपक माधवराव महाजन, दिपक संजय पाटील, समाधान रमेश पाटील, बंटी किशोर पाटील, धनराज सिताराम कुंवर, निशाद गणेश पाटील, सर्व. (रा. वाघाडी बु. ता. शिंदखेडा) यांनी महाराष्ट्र शासनदरबारी कोणतीही लेखी परवानगी न घेता, शासकीय कर्मचार्यांना न कळवता, परस्पर विना परवानगी, अनधिकृतपणे वाघाडी बु गावात ग्रामपंचायतीसमोर चौथर्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 14 फुटी अश्वारूढ पुतळा बसविला.
म्हणून त्यांच्यासह इतर ग्रामस्थ व पुतळ्या बसविण्यास चिथावणी देवुन गैरकायद्याची मंडळी जमवुन पुतळा बसवणार्या गावातील इतर लोकांवर भादवि. कलम 143, 149 सह महाराष्ट्र पुतळ्यांचा पवित्रभंगास प्रतिबंध अधिनियम सन 1997 चा कलम 11 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कमल 37 (1) (3) 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान 5 फेब्रुवारीपासून जिल्हा प्रशासनासह प्र.उपविभागीय पोलिस अधिकारी ए.एस.आगरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पोलिस उपनिरीक्षक दिवे यांनी ग्रामस्थांनी समजुत काढण्याचा प्रयत्न केला. गावात शांतता असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
