उत्तर महाराष्ट्रात पांढरं सोनं म्हणून ओळखलं जाणारा कापूस सध्या मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.
उत्तर महाराष्ट्रात पांढरं सोनं म्हणून ओळखलं जाणारा कापूस सध्या मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. साठवलेल्या कापसामध्ये अळ्या आणि सूक्ष्म जिवाणू तयार होत असल्यामुळे कापसाला हात लावल्यानंतर अंगावर खाज येऊन त्वचाविकाराचा संसर्ग पसरु लागला आहे. तालुक्यातील 15 गावे विळख्यात सापडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
मालेगाव तालुक्यातील शेतकरी इतर पिकासोबत मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करतात. मात्र या वर्षी कापसाला पाहिजे तेवढा भाव मिळत नसल्याने पुढे भावात वाढ होईल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी घरात मळ्यात कापूस साठवून ठेवला आहे. मात्र साठवून ठेवलेल्या कापसात अळ्या आणि सूक्ष्म जिवाणू तयार झाले आहेत.
कापसाला हात लावल्यानंतर अंगाला खाज येऊन चट्टे येऊ लागले आहेत. तालुक्यातील टोकडे गावा पासून सुरु झालेल्या या रोगाच्या विळख्यात हिसवाळ, शेरुळ, देवघट, पळासदरे, पाडळदे, सायतरपाडे, दहिवाळ, भिलकोट, साजवहाळ अस्ताने, बेंद्रेपाडे, शेंदुर्णी, नाळे, झोडगे, राजमाने, जळकू, लखाने आदी गावे या रोगाला बळी पडले आहेत. या गावातील शेतकऱ्यांना त्वचाविकार होऊ लागला आहे.
