जळगावातील सातपुडा पर्वतरांगांमधील काही गावातून अवैधरित्या गावठी कट्ट्यांचे कारखाने असून त्याठिकणाहूनच गावठी कट्ट्यांची विक्री केली जात असल्यााचे पोलिसांनी केलेल्या कारवायांमधून उघड झाले आहे. तसेच पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवायांमध्ये 20 ते 35 वयोगटातील तरुणांचा समावेश असल्याचे देखील उघडकीस आले आहे.
उमर्टी हे कट्टे निर्मितीचे केंद्र
चोपड्यापासून काही अंतरावर सातपुड्याच्या डोंगरामध्ये वसलेले उमर्टी गाव हे गावठी कट्टा निर्मितीचे केंद्र मानले जाते. याठिकाणी असलेल्या घनदाट जंगलांमध्ये गावठी कट्टे तयार केले जातात. त्यानंतर त्या कट्टयांची चोपडा, अमळनेर मार्गे संपुर्ण जिल्ह्यात तर गुजरातच्या सीमेवर असलेल्या सेंधवा, शहाद्यामार्गे गावठी कट्ट्यांची तस्करी केली जाते. धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर यासह आता पुण्यात देखील जळगावातून कट्ट्यांची तस्करी केली जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे.
कोडवर्डसह साखळी पद्धतीने मिळतो कट्टा
कट्टा मिळविण्यासाठी विशिष्ट लोकांच्या संपर्कात राहावे लागते. त्यानंतर अवघ्या दहा ते बारा हजारांपासून ते लाखापर्यंतचे गावठी कट्टे किंवा पिस्तुल उपलब्ध करुन दिले जाते. कोडवर्डच्या माध्यमातून साखळी पद्धतीने त्याची तस्करी होत असल्याने अनेक तस्कर मध्यप्रदेश व गुजराच्या भागातून चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात येवून त्याची इतर राज्यात देखील मोठ्य प्रमणात तस्करी केली जाते.
तरच होवू शकते रॅकेट उध्द्वस्त
जिल्ह्यात स्थानिक पोलिसांसह विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने गावठी कट्टे तस्करी करणार्यांवर कारवाई केली आहे. जिल्ह्यात गावठी कट्टे खरेदी- विक्री करणारे रॅकेट सक्रीय आहे. मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या उमर्टीसह सातपुडा परिसरात अवैधरित्या गावठी कट्ट्यांच्या निर्मितीसह त्याची विक्री होत असल्याचे लपून राहिलेले नाही. हे अड्डे उद्धवस्त करण्यासाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेश पोलीसांनी कारवाईची संयुक्त मोहिम राबविण्याची गरजेची आहे.
चार वर्षातील कारवाई
2019- 49 गावठी पिस्तुल, 48 जिवंत काडतुस, 46 गुन्हे, 59 आरोपी
2020- 58 गावठी पिस्तुल, 76 जिवंत काडतुस, 46 गुन्हे, 81 आरोपी
2021- 55 गावठी पिस्तुल, 83 जिवंत काडतुस, 47 गुन्हे, 71 आरोपी
2022- 76 गावठी पिस्तुल, 105 जिवंत काडतुस, 43 गुन्हे, 65 आरोपी
अवैध शस्त्रांविरोधात पोलीस दलाने गंभीर दखल घेतली आहे. शस्त्रांची तस्करी करणार्यांवर आमची नजर आहे. अशी तस्करी करणार्यांविरोधात धडक मोहीम राबविली जाणार आहे. तसेच शहराची शांतता भंग करणार्या गुन्हेगारी क्षेत्रातील टोळ्यांचाही बंदोबस्त केला जाणार आहे.
