नाशिकच्या महाविद्यालयातील पाच मित्रांनी एकत्र येत मौजमजा करण्यासाठी पैसे मिळावेत म्हणून मोबाईल चोरी करण्यास सुरुवात केली.
दरम्यान मोबाईल चोरीचे चे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले. चेतन निंबा परदेशी, शशिकांत सुरेश अंभोरे, विजय सुरेंद्र श्रीवास्तव अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. या संशयितांकडून पोलिसांनी शहरातून विविध ठिकाणाहून चोरलेले 22 मोबाईल आणि गुन्ह्यांत वापरलेली मोटरसायकल असा एकूण चार लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. संशयितांची आणखी चौकशी केल्यानंतर आणखी एका संशयिताचे नाव समोर आले. त्यानुसार निखिल अर्जुन विंचू यास ताब्यात घेत आडगाव पोलिसांच्या स्वाधीन केले.
दरम्यान या गुन्ह्याचा तपास घेतला जात असून संशयितांनी महाविद्यालयीन विद्यार्थी असून कॉलेजमध्ये मौज मजा करण्यासाठी पैसे मिळावे या हेतूने गुन्हे केल्याचे समोर आले. संशयितांना अटक केल्यानंतर नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यात असलेले सात गुन्हे आतापर्यंत उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस उपनिरीक्षक विष्णू उगले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे आदींच्या पथकाने केली.
फोन करण्याच्या बहाण्याने...
नाशिक शहरात अनेकदा चोरट्यांनी चोरी करण्याच्या अनेक क्लृप्त्या शोधून काढल्या आहेत. फोन करण्याच्या बहाण्याने मोबाईल फोन घेऊन पोबारा करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे रस्त्यावरून जात असताना अनोळखी व्यक्तीकडे मोबाईल देताना सावधगिरी बाळगा किंवा रस्त्याने जाताना मोबाईलवर बोलत असल्यास काळजीपूर्वक इतरही हालचालींवर लक्ष ठेवा. अन्यथा मोबाईल चोरी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आवाहन नाशिक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
