गावखेड्यातही आता लाचखोरीच्या घटना उघडकीस येऊ लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने अनेकांना धडकी भरली आहे.
इगतपुरी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि माजी सरपंचाला पन्नास हजाराची लाच घेतांना अटक केली आहे. नाशिकच्या एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
इगतपुरी तालुक्यातील या कारवाईने नाशिक जिल्ह्यातील गावागावात कारवाईची चर्चा होऊ लागली आहे. लाच घेतांना अटक झाल्याने दबक्या आवाजात गावकरी उलटसुलट चर्चा करत आहे.
बलायदुरी ग्रामपंचायतीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर ग्रामपंचायतीकडून काही रक्कम तक्रारदार शिपायाला दिली जाणार होती. 1 लाख 64 हजार 682 रुपये इतकी ती रक्कम होती.
हीच रक्कम देण्याच्या बदल्यात ग्रामपंचायतीचे आजी माजी संरपंच आणि ग्रामसेवक यांनी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली, त्यानंतर 60 वर्षीय तक्रारदार यांनी थेट एसीबीचं कार्यालय गाठलं.
सेवानिवृत्त झालेले शिपाई यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सर्व माहिती दिली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचून ही कारवाई केली आहे.
या कारवाई सरपंच हिरामण पांडुरंग दुभाषे, ग्रामसेविका आशा देवराम गोडसे, माजी सरपंच मल्हारी पंढरीनाथ गटकळ यांना लाच घेतांना रंगेहाथ पकडले आहे. ग्रामपंचायत कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली आहे.
सेवानिवृत्तीचे पैसे घेण्याच्या बदल्यात पन्नास हजारांची लाच मागणं गावच्या पुढाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. त्यामध्ये टाकेघोटी ग्रामपंचायतमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
गावखेड्यातही आता लाचखोरीच्या घटना उघडकीस येऊ लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने अनेकांना धडकी भरली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक्षक पडी शर्मिष्ठा वालावलकर यांनी नियुक्ती झाल्यापासून कारवायांमध्ये वाढ झाली असून सापळे रचून ते यशस्वी होतांना दिसून येत आहे.
इगतपुरी येथे झालेल्या कारवाईत एसीबीच्या पथकात संदीप घुगे, वैशाली पाटील, एकनाथ बाविस्कर, राजेंद्र जाधव, शरद हेंबाडे, नितीन नेटारे, संतोष गांगुर्डे यांचा समावेश होता.
