ही धक्कादायक घटना गंगापूर रोडवरील शिवाजी नगरातील पाझर तलावाजवळील झोपडपट्टीत घडली. विशेष म्हणजे पत्नी काम करताना खाली पडली, असा बनाव रचून पतीने हा खून दडविण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉक्टरांनी शवविच्छेदन केले असता हा खून असल्याचे उघड झाले.
त्यानुसार गंगापूर पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली आहे. मीरा पीनू पवार (वय ४० वर्ष) असे मृत पत्नीचे नाव असून पीनू सोमनाथ पवार (वय ४४ वर्ष) असे संशयित पतीचे नाव आहे. पोलिसांनी सोमनाथ याला अटक केली असून या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सोमनाथ पवार आणि त्याची मृत पत्नी मीरा पवार ह्या मोलमजुरी करुन कुटुंबाचा गाडा चालवितात. दोघांनाही दारूचे व्यसन असल्याने त्यांच्यात नेहमी वाद होत होते. सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद झाला.
त्यावेळी आरोपी सोमनाथ याने दारूच्या नशेत पत्नी मीराला फावड्याच्या लाडकी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत मीरा यांच्या छातीला तसेच पोटाला जबर मार लागला. त्यांच्या जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी सोमनाथ याने मीरा यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करुन ती काम करताना पडली, त्यामुळे तिला दुखापत झाल्याचे सांगितले.
डॉक्टरांनी तपासून मीरा यांना मृत घोषित केले. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले असता मीरा यांना जबर मारहाण करुन त्यांची हत्या झाल्याचा शवविच्छेदनाचा अभिप्राय गंगापूर पोलिसांना दिला. त्यानुसार पथकाने पवार याला ताब्यात घेतले. कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीची हत्या केल्याचं उघड होताच, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
