दारू पिऊन स्वतःच्या अल्पवयीन मुलींना नेहमी मारहाण करणाऱ्या आईविरुद्ध भाईंदर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, निमई बाऊर ( ३९ ) हे भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक फेज ८ मधील सिद्धिविनायक टॉवरमध्ये पत्नी सुदेसना (३३) आणि २ मुलींसोबत राहतात. निमई हे मुंबईच्या झवेरी बाजार भागात दागिने डिझाईन करायचे काम करतात . निराली हि ६ वीत तर नायेरा सिनियर केजी मध्ये शिकतेय .
गेल्या ८ वर्षांपासून सुदेसना हिला दारूचे व्यसन जडले असून ती दारू पिऊन नेहमी पती निमई व मुलींना मारझोड, शिवीगाळ करत होती. २५ फेब्रुवारी रोजी निमई हिने आपल्या दोन्ही मुलींना जबर मारहाण केली. त्यानंतर दोन्ही मुली निमईचे मित्र अमोल माहेती याच्या घरी गेल्या. अमोलने निमईला कॉल करून सांगितले की, तुझ्या दोन्ही मुली माझ्या घरी आल्या असून त्यांच्या हाता पायाला खूप लागलेले आहे .
निमई हे कामावरून लगेच निघाले व मित्रा कडे पोहचले. दोन्ही मुलींना त्यांच्या आई सुदेसना हिने जबर मारहाण केल्याचा व्हिडीओ छोट्या मुलीने वडिलांना दाखवला. दोन्ही मुलींवर औषधोपचार करून निमई हे घरी पोहचले. त्यांनी सुदेसना हिला मुलींना मारहाण केल्याचा जाब विचारला असता तिने पतीला शिवीगाळ केली.
निमई यांच्या फिर्यादी वरून सुदेसनावर अल्पवयीन मुलींना मारहाण केल्या प्रकरणी नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.
