निरीक्षक पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार धुळे-दोंडाईचा रस्त्यावर दोंडाईचाहून धुळ्याला जाणाऱ्या एक निळ्या रंगाचे टाटा एस चारचाकी वाहन (एमएच ०४, एचडी ९५००) जाणार असून, येथील पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरीचा माल घेऊन जाणार असल्याचे समजताच चक्रे फिरविली. पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, पोलिस उपनिरीक्षक सचिन गायकवाड, शरद लेंडे, पोलिस शिपाई प्रवीण धनगर, पंकज गावित यांनी दोंडाईचाकडून धुळ्याकडे जाणारी गाडी (एमएच ०४, एचडी ९५००) दिसून आल्याने वाहनचालक शेख वसीम शेख शकूर पिंजारी (वय ३५, रा. रनाळा, ता.जि. नंदुरबार) सोबत एजाज शेख नबी शेख (३७, रा. गौसियानगर, दोंडाईचा) वाहनात असलेल्या मालाबाबत विचारले असता भंगार असल्याचे सांगितले.
भंगार घेऊन जाण्याबाबत त्यास परवान्याबाबत विचारपूस केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे व भंगार माल त्याच्या सोबत असलेला एजाज शेख नबी शेख याचा आहे व त्याच्याच गोडाउनमधून भरला असल्याचे सांगितले. एजाज शेख नबी शेख याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने शाहरुख रेहमान शाह (रा. गौसियानगर, दोंडाईचा) व त्याचे इतर साथीदार यांनी चोरी करून मला विकल्याचे सांगितले. त्यानुसार दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, चोरीला गेलेला माल ॲल्युमिनिअम तारेसह एक लाख २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक सचिन गायकवाड तपास करीत आहेत.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी अन्साराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, पोलिस उपनिरीक्षक सचिन गायकवाड, शरद लेंडे, पोलिस शिपाई प्रवीण धनगर, पंकज गावित यांनी कारवाई केली. दरम्यान नवीन पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेमणुकीमुळे भुरट्या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या जाणार असल्याची चर्चा आहे.
