कारमध्ये जाताना अडवलं, धाड...धाड...धाड तीन गोळ्या झाडल्या, नवी मुंबईत दिवसाढवळ्या व्यावसायिकाची हत्या

फुले शाहू आंबेडकर
0

नवी मुंबईतील नेरूळमध्ये एका बांधकाम व्यावसायिकावर दोन अज्ञातांनी गोळीबार केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात संबंधित बांधकाम व्यावसायिकाचा कारमध्येच मृत्यू झाला आहे.

नवी मुंबई नेरुळ येथील सेक्टर नं. ६ येथील अपना बाजारच्या जवळ भररस्त्यात तीन ते चार गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज संद्याकाळी साडेचारच्या सुमारास नेरूळ येथे कारने जात असताना बांधकाम व्यावसायिकावर गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या झाडण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सावजी पटेल असं असून ते बांधकाम व्यावसायिक होते.
नवी मुंबई पोलीस अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. नेरूळ येथे सावजी पटेल हे आपल्या वाहनातून जात असताना एका दुचाकीवर आलेल्या दोघं मारेकऱ्यांनी त्यांच्या छातीत आणि पोटात अशा तीन ते चार गोळ्या झाडल्या. पटेल यांचा त्यांच्या कारमध्येच मृत्यू झाला. घटनास्थळी गोळ्यांचे तीन काडतूस मिळून आले आहेत. व्यवसायाच्या वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मात्र, हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी दिली. सावजी पटेल हे आपल्या कारने नेरूळ येथून जात असताना दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर पिस्तूल रोखून गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज झाल्याने भयभीत झालेल्या स्थानिक नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षात याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर सावजी पटेल यांचा मृतदेह गाडीत आढळून आला. पोलिसांना घटनास्थळी तीन रिकामी काडतूस सापडले असून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. अनेक वर्षानंतर नवी मुंबई पुन्हा या हत्येनं हादरली आहे. बांधकाम व्यावसायिकाची हत्या झाल्याने पोलीस देखील सतर्क झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच डीसीपी अमित काळे, डीसीपी पानसरे यांच्यासह क्राईम ब्रँचचे अधिकारी आणि नेरूळ पोलीस ठाण्याचे पी.आय यांनी घटनास्थळी पाहणी केली. ही हत्या जमिनीचा व्यवहार, प्रॉप्रर्टी किंवा इतर फिसकटलेल्या आर्थिक व्यवहारातून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. इंपिरीया ग्रुपचे पटेल यांच्यासह पाच जण भागीदार आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default