धुळे तालुक्यातील लामकनी परिसरामध्ये व्यापाऱ्यातर्फे कापूस खरेदी केला जात आहे. कापसासह वाहनाचे वजन करण्यापूर्वी या व्यापाऱ्यातर्फे रिकाम्या वाहनाचे वजन करीत असताना रिकाम्या वाहनाचे वजन वाढविण्यासाठी या व्यापाऱ्याने शक्कल लढवली होती. या वाहनामध्ये जवळपास दोन ते तीन क्विंटल दगड भरून वाहनाचे वजन करण्यात आले. त्यानंतर कापूस भरण्यासाठी शेताकडे जात असताना रस्त्यात या व्यापाऱ्याने गाडीत भरलेले दगड फेकून दिले.
दगड फेकताना दिसले
गाडीतून दगडफेकत असताना परिसरातील शेतकऱ्यांच्या हे लक्षात आल्यानंतर या शेतकऱ्याने ज्या शेतकऱ्याच्या शेतात कापूस भरण्यासाठी व्यापारी जात होता. त्या शेतकऱ्यास या बाबतची माहिती दिली. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने व परिसरातील शेतकऱ्यांनी फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यास काठीने चांगलाच चोप देऊन अद्दल घडवली आहे.
एकीकडे हवामान बदलाचा फटका सहन करून त्याचबरोबर पिकावरील रोगराई, या सर्व परिस्थितीला तोंड देऊन पिकवलेल्या पिकाला बाजारात कवडीमोल दर मिळत आहे. मनावर दगड ठेवून आपलं पीक कवडीमोल दरात व्यापाऱ्यास देताना व्यापाऱ्यांच्या फसवणुकीला देखील या शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यापुढे अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करताना या व्यापाऱ्याला घडवलेली अद्दल या व्यापाऱ्यास व यासारख्या इतर व्यापाऱ्यांना चांगलीच लक्षात राहील.
