धक्कादायक! बदलापूरमध्ये ३५ वर्षीय महिलेची हत्या; राहत्या घरात आढळला मृतदेह

फुले शाहू आंबेडकर
0
बदलापूर शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बदलापूर  पूर्वेत एका ३५ वर्षीय महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. शिरगाव परिसरातील राऊत आर्केड इमारतीत ही धक्कादायक घटना घडली.
राजश्री भोसले (वय ३५ वर्ष) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतलीय. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.
बदलापूर पूर्वेच्या शिरगाव परिसरातील राऊत चौकात राऊत आर्केड नावाची इमारत आहे. या इमारतीत राजश्री गणेश भोसले ही ३५ वर्षीय महिला पती आणि मुलासह वास्तव्याला होती. आज दुपारच्या सुमारास ही महिला घरात मृतावस्थेत आढळून आली. 
याबाबतची माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून प्रवेश केला असता राजश्रीच्या गळ्यावर भोसकून तिची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी पंचनामा करून तिचा मृतदेह ताब्यात घेत बदलापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
दरम्यान, राजश्रीची हत्या ही तिच्या पतीने गणेश भोसले यानेच केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्या दृष्टीने पोलिसांचा सध्या तपास सुरू असल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे.
या घटनेनंतर गणेश हा फरार झाला असून त्याचा फोनही बंद येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही हत्या का करण्यात आली? याचं कारण मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नसून बदलापूर पूर्व पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default