भावी पत्नीसोबत व्हीडीओ कॉल करीत तरुणाने घेतला गळफास नाथवाडा येथील घटना; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

फुले शाहू आंबेडकर
0

 आपल्या होणार्‍या पत्नीला  व्हिडीओ कॉल करून कितेश गौतम बागडे (वय-20) रा. नाथवाडा या तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दि. 22 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनीतील नाथवाडा येथे घडली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील सिंधी कॉलनी जवळील नाथवाडा येथे कितेश बागडे हा आपल्या परिवारासह राहत असून तो महाविद्यालयीन शिक्षण करीत होता. दोन महिन्यापुर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता. नेहमी प्रमाणे रात्री 9 वाजता घराच्या दुसर्‍या मजल्यावर असतांना तो आपल्या होणार्‍या पत्नीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होता. व्हिडीओ कॉल सुरू असतांना अचानक कितेश याने गळफास घेवून आपली जिवनयात्रा संपविली. हा प्रकार कितेशची आई गुड्डी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी वरच्या मजल्यावर धाव घेतली त्यांना आपला मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेची माहिती मिळताच शेजारी राहणार्‍या तरूणांनी धाव घेवून कितेश ला खाली उतरवून त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणूका भंगाळे यांनी कितेशची तपासणी करीत त्याला मयत घोषीत केले.

पुढच्या महिन्यात होणार होता विवाह

दोन महिन्यांपुर्वी साखरपुडा झाल्यानंतर पुढच्या महिन्यात दि. 27 मे रोजी कितेशचा विवाह सोहळा पार पडणार होता. परंतु त्याने आत्महत्येसारख्या टोकाचा निर्णय घेतल्यामुळे त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद


घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई गुड्डी, वडील गौतम दयाराम बागडे, लहान भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default