रागात हातपाय तोडून खून, चूक कळताच पेटवलं; जन्मदाता बाप, सख्खा भाऊ अन् लेकच ठरला काळ

फुले शाहू आंबेडकर
0
जालन्यामध्ये हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे तिघांनी मिळून घरातल्या व्यक्तीची अतिशय निर्दयीपणे हत्या केली. या घटनेचा उलगडा होताच संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
घरात सतत त्रास देतो म्हणून जन्मदाते वडील, भाऊ आणि पोटचा मुलगा अशा तिघांनी संगनमत करून एकाला जिवानिशी संपवल्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील शिरनेर या गावात घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकाराने रक्ताच्या नात्याला काळीमा फासला आहे.
पोटच्या मुलाला जिवानिशी मारून त्यानंतर त्याचे प्रेत जाळून टाकले जात असल्याची पक्की माहिती अंबड पोलिसांना गोपनीय खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून अंबड पोलिसांनी ताबडतोब तपासाची चक्रे फिरवली आणि घटनास्थळ गाठले. तिथे गेल्यावर जे दिसले आणि समजले त्यावरून पोलीसही चक्रावले.
जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यांतील शिरनेर येथील नारायण वैद्य यांचा मुलगा धर्मराज हा नेहेमी घरात वाद घालायचा. त्याच्या या स्वभावाला घरातील सगळेच कंटाळले होते. घरच्यांनी त्याला कित्येकदा समजावून सांगितले, रागावून पाहिले पण त्याचा स्वभाव काही बदलेना.
१५ मे रोजी म्हणजे सोमवारी धर्मराज वैद्य याने घरात वाद घालायला सुरूवात केली. पण काल नशिबाचे फासे नेमके उलटे पडले आणि वाद हा वाढत हाणामारीपर्यंत गेला. त्याच्या त्रासाला कंटालेल्या वडील नारायण चिमाजी वैद्य, भाऊ कर्णराज नारायण वैद्य आणि मुलगा निर्गुण धर्मराज वैद्य यांनी संगनमतकरून धनराजला शेतात नेवून काठीने हातावर, पायावर मारून हातपाय मोडून त्याचा खून केला.
भानावर येताच आपण काय केले हे तिघांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी धर्मराजचे प्रेत उचलले, लाकडाचे सरण तयार केले आणि त्यावर प्रेत टाकून पेटवून दिले. त्यात धर्मराजचा देह १०० टक्के जळून खाक झाला. पण या प्रकरणाला वाच्यता फुटली आणि पोलिसांना माहिती मिळाली.
पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास केला आणि तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी खाक्या दाखवताच तिघांनी गुन्हा कबूल केला आहे. पो.उप.निरि.एम.बी.स्कॉट यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात कलम ३०२, २०१, ३४ भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे हे करीत आहेत. त्रास देणाऱ्या मुलाचा शेवट जन्मदाता बाप, सख्खा भाऊ व पोटच्या मुलानेच केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default