याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्राम सौंदड येथे शुक्रवारी डीकेश्वरी भुसारी या विवाहीत तरुणीने गोंदिया चांदाफोर्ट रेल्वेसमोर आत्महत्या केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी बुधवारी तिचा पती दिगंबर भुसारी यानेही आत्महत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. या भयंकर प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या जोडप्याचा नुकताच जानेवारी महिन्यात प्रेम विवाह संपन्न झाला होता. मात्र, हा प्रेम विवाह औटघटकेचा ठरत अल्पशा कालावधीनंतर भंगला होता. पती पत्नीने चार दिवसांच्या अंतराने आपले आयुष्य संपवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, डूग्गीपार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिगंबर भुसारी असे मृताचे नाव आहे. त्याची पत्नी डीकेस्वरी हीने याच रेल्वे मार्गावर आत्महत्या केली होती. पत्नी नंतर आता पतीने आत्महत्या का केली याचा शोध पोलिस घेत आहेत. सदर अपघाताची माहिती रेल्वे विभागाचे कर्मचारी यांनी डूग्गीपार पोलिसांना दिली. सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दिगंबर श्रावण भुसारी याचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे
