महिनाभरापूर्वी लग्न, पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; मन सुन्न करणारी घटना

फुले शाहू आंबेडकर
0
जालना शहरातून एक भयानक घटना उघडकीस आली आहे. महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या एका १९ वर्षीय विवाहितेने मंगळवारी दुपारच्या सुमारास गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे. साक्षी अभिजीत तायडे, असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून साक्षीने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिन्यापूर्वीच साक्षीचा विवाह अभिजीत तायडे या तरुणांसोबत झाला होता. विवाह झाल्यापासून अभिजित साक्षीसोबत नीट बोलत नव्हता. गेल्या एक महिन्यापासून अभिजित हा वारंवार माझा विवाह माझ्या संमतीविना तुझ्याशी लावून दिला आहे, त्यामुळे तू मला अजिबात आवडत नाही, असं म्हणत साक्षीचा छळ करत होता.

त्याचबरोबर लग्न जमवताना तुझ्या वडिलांनी बोलणी प्रमाणे हुंडा आणि लग्नात वस्तूही दिल्या नाहीत, म्हणून या महिन्यातच तुझ्या बापाकडून वस्तू घेऊन ये, असं म्हणत त्रास देत होता. आपल्याला होत असलेल्या त्रासाची माहिती साक्षीने आपल्या माहेरच्या मंडळींच्या कानावर घातली होती.
मात्र, तरी सुद्धा अभिजितकडून होणारा त्रास वाढत चालल्याने अखेर साक्षीने रात्री राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याच्या आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. इतकंच नाही, तर अभिजित तायडे यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी साक्षीचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. नवविवाहितेने महिनाभरातच आपली जीवनयात्रा संपवल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default