बापलेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मुंबईतून समोर आली आहे. शहरातील कापसवाडी, अंधेरी परिसरात एका मुलाने आपल्याच वडिलांची झोपेत असताना निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. नोमन नोमन समद शेख (वय 24) असे आरोपी मुलाचे नाव असून त्याने वडिलांना मारण्यासाठी रॉडचा वापर केला. हा गुन्हा रात्री घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी मुलगा नोमान शेख याला ताब्यात घेतले आहे.
डीएन नगर पोलिसांनी नोमनविरुद्ध आयपीसी कायद्याच्या कलम 320, 324 आणि 427 नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी मुलाला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद कुर्डे यांनी सांगितले की, "दोन महिन्यांपूर्वी आरोपी मुलगा आणि त्याच्या वडिलांमध्ये आरोपी मुलाच्या नोकरीच्या कारणावरून वाद झाला होता. त्या भांडणाचा राग येऊन आरोपी मुलाने वडिलांच्या डोक्यात वार केले. 30 जून रोजी पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी सर्वजण झोपलेले असताना आरोपी नोमान याने वडिलांच्या डोक्यात लोखंडी रॉडने त्यांच्यावर अनेक वार केले. जखमी अवस्थेत वडिलांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर डीएन नगर पोलिसांनी 24 वर्षीय तरुण नोमन शेख याला तत्काळ अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
मुंबईत एका तरुणाने आपल्या मैत्रिणीचा चालत्या ऑटोरिक्षात गळा चिरून खून केल्याचा आरोप आहे. खून केल्यानंतर आरोपीने त्याच धारदार शस्त्राने स्वत:लाही जखमी केले. ही घटना सोमवारी (19 जून) मुंबईतील साकीनाका परिसरात उघडकीस आली आहे. दीपक बोरसे असे आरोपीचे नाव आहे. मुलगा आणि मुलगी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. साकीनाका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, ही घटना दत्त नगरमधील खैरानी रोडवर घडली. दीपक बोरसे याने चालत्या ऑटोरिक्षात मुलीचा गळा आवळून खून केला. सुटण्यासाठी तिने रिक्षातून खाली उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र थोडे अंतर गेल्यावर ती खाली पडली.
