ते अवैधरीत्या गांजा विक्री करण्याचा प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई शहादा पोलिसांनी केली आहे.
याबाबत घटनेची माहिती अशी, की सोमवारी (ता. १८) नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त माहिती मिळाली, की शहादा पोलिस ठाणे हद्दीतील वडगाव ते तितरीदरम्यान रोडवर
कपाशी पिकाचे शेताच्या बाजूला एक चारचाकी वाहन संशयास्पदरीत्या बेवारस उभ आहे. ती माहिती त्यांनी शहादा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना कळवून कारवाईचे आदेश दिले.
पोलिस निरीक्षक बुधवंत यांनी पथकासह वडगाव ते तितरीदरम्यान बेवारस स्थितीत उभ्या असलेल्या वाहनाची पाहणी केली असता, वाहनाचे सर्व दरवाजे व डिक्की लॉक असल्याचे व वाहनाजवळ कोणीही दिसून येत नसल्याचे निदर्शनास आले.
म्हणून बुधवंत यांनी वाहनाला असलोद दूरक्षेत्र येथे आणून मॅकेनिककडून वाहनाची डिक्की व दरवाजे उघडून पाहिले असता, डिक्कीमध्ये दोन प्लास्टिक बॉक्स व साड्यांमध्ये बांधलेले दोन गाठोडे मिळून आले. त्यामध्ये ९० हजार ७०० रुपये किमतीचा आठ किलो ११ ग्रॅम वजनाचा सुका गांजासदृश अंमली पदार्थ मिळून आला.
पथकाने वाहनमालकाचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांचे नाव वसंत सुरेश पावरा (वय २७, रा. जाम, ता. शहादा, जि. नंदुरबार), प्रदीप चुनिलाल जाधव (वय २२, रा. वाघर्डे ता. शहादा, जि. नंदुरबार ) असे आहेत. त्यांना चारचाकी वाहन व वाहनामध्ये मिळून आलेला गांजासदृश अंमली पदार्थाबाबत विचारपूस केली असता, त्यांनी तो गांजा विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.
वसंत पावरा व प्रदीप जाधव यांना ताब्यात घेऊन ९० हजार ७०० रुपये किमतीचा आठ किलो ११ ग्रॅम वजनाचा सुका गांजासदृश अंमली पदार्थ व दोन लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन, असा एकूण दोन लाख ९० हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, शहादा उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रदीप राजपूत, पोलिस हवालदार अशोक कोळी, पोलिस नाईक घनश्याम सूर्यवंशी, योगेश थोरात, संदीप लांडगे, पोलिस अंमलदार राकेश मोरे, भरत उगले, मिथुन शिसोदे यांच्या पथकाने केली.
