सटाणा : शहरातील बसस्थानकामागील साठ फूटी रस्त्यालगत असलेल्या तीन दुकानांना आज शनिवर (ता.३०) रोजी दुपारी ३.३० वाजता विद्युत मीटरच्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली.
या भीषण आगीत तिन्ही दुकानातील विक्रीसाठी असलेली सर्व वस्तु, मशीनरी, महत्वाचे कागदपत्रे जळून खाक झाले असून जवळपास तीस लाख रुपयांचा माल जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र पालिकेचा अग्निशमन बंब तब्बल तासभर उशिरा पोहोचल्याने आग आटोक्यात आणणे अशक्य झाले
शहरातील बसस्थानकामागील साठ फूटी रस्त्यालगत असलेल्या दैनंदिन भाजीपाला बाजारात अनेक व्यावसायिकांची दुकाने आहेत.
आज दुपारी साडेतीन वाजता नरेश तुकाराम खैरनार यांच्या आकांक्षा फ्रेम मेकर या दुकानातील विद्युत मीटरमध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि शॉर्ट सर्किटमुळे क्षणार्धात आग लागली.
काही कळण्याच्या आतच आगीने रौद्ररूप धारण केले. फ्रेम मेकरचे दुकान असल्याने लाकडी सामान, मशिनरी तसेच संगणक साहित्याला आगीने मोठा पेट घेतला. लगतच त्यांचे गोडाऊन असल्याने आगीचा मोठा भडका उडाला.
परिणामी शेजारील रविंद्र किसन गोसावी यांच्या रवी टेलर व मुन्ना भटू निकम यांच्या शिवशंकर मेन्स पार्लर या दोन्ही दुकानांना सुद्धा आगीने कवेत घेतले. आग लागताच परिसरातील नागरिकांनी पाणी टाकून आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
त्यातच घटनास्थळी पोहोचलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक उज्वलसिंग राजपूत यांच्यासह नागरिकांनी तत्काळ पालिकेच्या अग्निशमन विभागास फोन केला. मात्र अग्निशमन विभागातील कर्मचार्यांनी फोन उचलले नाही.
अखेर काही नागरिकांनी स्वत: ताहाराबाद रस्त्यावरील अग्निशमन केंद्रात गाठले आणि कर्मचार्यांना घटनास्थळी येण्याची विनंती केली. मात्र अग्निशमन बंबास उशीर झाल्याने आगीमध्ये तिन्ही दुकाने जळून खाक झाली.
सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून नागरिकांच्या सतर्कतेमुळे इतर दुकाने आगीपासून वाचवता आली. घटनेनंतर तहसिलदार कैलास चावडे, तलाठी जयप्रकाश सोनवणे, तलाठी रोशन गौतम, कोतवाल रविंद्र बच्छाव हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या माजी नगरसेविका सुमनताई सोनवणे यांच्यासह दुकानमालक महिलांनी तहसीलदार श्री.चावडे यांच्यासमोर अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि अग्निशमन बंब उशिरा पोहचल्याची तक्रारही केली.
यावेळी तलाठी जयप्रकाश सोनवणे यांनी घटनेचा पंचनामा केला. आगीत नरेश खैरनार यांचे २० लाख ४३ हजार रुपये, रविंद्र गोसावी यांचे ४ लाख ८५ हजार रुपये तर मुन्ना निकम यांचे तीन लाख दोन हजार दोनशे रुपये इतके नुकसान झाले आहे.
तहसीलदार कैलास चावडे यांनी शासनाकडून अधिकाधिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुनील मोरे, शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते शाम बगडाणे, दादू सोनवणे, हेमंत भदाणे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि नुकसानग्रस्तांचे सांत्वन केले.
माजी आमदार संजय चव्हाण यांनी वीज महावितरणच्या अधिकार्यांशी फोनवर संपर्क साधत घटनेची माहिती दिली आणि नुकसानग्रस्तांना तत्काळ आर्थिक नुकसानभरपाई मिळवून देण्याची सूचना केली.
यावेळी बापू सोनवणे, विकास देवरे, विकी कापडणीस, तुषार सोनवणे, हिरामण सोनवणे, जयेश चोपडा, निलेश शिरोडे आदींसह नागरिक उपस्थित होते.
अग्निशमन विभागाच्या कर्मचार्यांची दिरंगाई
आज शहरातील आठवडे बाजार असल्याने साठ फूटी रस्त्यावर दररोज भरणारा दैनंदिन भाजीपाला बाजार शहरातील आरम नदीकिनारी महालक्ष्मी मंदिर परिसरात असल्याने हा परिसर आज मोकळा होता. अन्यथा याठिकाणी दररोज मोठी गर्दी असते.
