उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे व सांगवी पोलिसांनी सायंकाळनंतर छापा घातला. जप्त मुद्देमालाची मोजणी करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या कारवाईत यंत्रसामग्री व अन्य साहित्य मिळून सुमारे ८० लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.
डिझेल इंजिनद्वारे केले जाणारे वायुप्रदूषण नियंत्रित व्हावे या हेतूने डिझेल एक्सझोस्ट फ्लुइडचा (डीईएफ) वापर केला जातो. बहुतांश डिझेल पंपाबाहेर डीईएफ यूरिया नावाने हे रसायन विकण्याची लहान-मोठी केंद्रे आहेत. काही दिवसांपासून बनावट डीईएफ रसायनाची विक्री सुरू असल्याचा संशय मूळ निर्मात्या टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांना होता.
याबाबत त्यांनी तपास करून शिरपूर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात डीईएफ द्रव्य तयार करण्याचे संयंत्र असलेला कारखाना पळासनेर शिवारात आढळला. पोलिसांनी त्याबाबत चौकशी सुरू केली असून, उशिरापर्यंत ही कार्यवाही सुरू होती. तेथे प्रत्यक्ष उत्पादन सुरू होते किंवा नाही याबाबतही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
