येथे चोरट्यांनी लंपास केलेले साहित्य पोलिसांनी ताब्यात घेत संशयित चोरट्याला अटक केली. एलईडी टीव्ही, शिलाई मशिन व वीजपंप आदी वस्तू चोरीस गेल्या होत्या.
घरमालकाच्या तक्रारीनंतर लगेच २४ तासांत दोंडाईचा पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून मुद्देमालासह संशयितास ताब्यात घेतले आहे. त्यामुळे भुरट्या चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत
वसीन ऐनुद्दीन खाटीक (रा. गरीब नवाज कॉलनी) यांच्याकडे चोरी झाल्याने अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी शोधपथक तयार केले.
पथकात पोलिस उपनिरीक्षक पी. पी. सोनवणे, हवालदार सुनील महाजन, पी. व्ही. पवार, हिरालाल सूर्यवंशी, अनिल धनगर, श्री. गावित यांनी शहरात माहिती काढून संशयित रोहिदास छगन कोळी (वय २२, रा. चैनी रोड, दोंडाईचा) याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिस पथकाने हस्तगत केला. सुमारे २१ हजार रुपये किमतीचे एलईडी टीव्ही, शिलाई मशिन, पाण्याचा वीजपंप ताब्यात घेतला. संशयित चोरट्याला अटक केली.
