ठाणे : घराचे रजिस्ट्रेशन करून देण्यासाठी 12 हजरांची लाच स्वीकारणाऱ्या कल्याण पूर्वेकडील सहाय्यक दुय्यम निबंधकाला ठाणे अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. राज कोळी असं या अधिकाऱ्याचं नाव असून तक्रारदाराकडे त्याने 24 हजाराची मागणी केली होती.
लाचखोर दुय्यम निबंधकांने तक्रारदाराकडे 24 हजारांची मागणी केल्यानंतर तडजोडअंती ही रक्कम बारा हजार रुपये ठरली. बुधवारी सकाळच्या सुमारास कल्याण पूर्वेकडील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात राज कोळी याला बारा हजार रुपये स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचत अटक केली. राज कोळी यांच्यासोबत एका खाजगी इसमाला देखील ठाणे अँटी करप्शन ब्युरोने ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला.
खुनाच्या गुन्ह्यातून मुलाचं नाव कमी करण्यासाठी आईकडे लाच मागितली
भिवंडी येथील नारपोली पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांना दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना नारपोली पोलिस ठाण्यातच ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं. खुनाच्या गुन्ह्यातून मुलाचं नाव कमी करण्यासाठी त्याने आरोपीच्या आईकडून लाच मागितली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 25 नोव्हेंबर रोजी अपहरण झालेल्या 16 वर्षांचा योगेश रवी शर्मा या अल्पवयीन मुलाची हत्या करून मृतदेह गाडून, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे 7 डिसेंबर रोजी उघड झाले होते. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी दाखल केलेल्या हत्येच्या गुन्ह्यात आयुश विरेंद्र झा, मनोज नारायण टोपे, अनिकेत तुकाराम खरात, शिवाजी धनराज माने, संतोष सत्यनारायण ताटिपामुल या आरोपींना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार हे करीत होते.
गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी लाच मागितली
आरोपी अनिकेत खरात याचे नाव गुन्ह्यातून कमी करण्यासाठी पैसे द्यावे लागतील, नाहीतर कुटुंबीयांना या प्रकरणात अडकवण्याची धमकी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांनी दिली. त्यानंतर त्याने अनिकेतच्या आईकडे 5 लाखांची मागणी केली. त्यानंतर तडजोड होऊन अनिकेतच्या आईने दोन लाख देण्याचे कबूल केले.
दरम्यान, अनिकेतच्या आईने सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांची तक्रार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नारपोली पोलिस ठाण्यात मंगळवारी सकाळी केलेल्या कारवाईत शरद पवार यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
