मध्यंतरी थंडावलेल्या वाळूच्या चोरट्या वाहतुकीने पुन्हा उचल खाल्ली आहे. मात्र यावेळेला वाहतुकीसाठी वाळू तस्करांकडून टिप्परच्या तुलनेत ट्रकचा (एलपी) अधिक वापर होताना दिसत आहे. टिप्पर वगळता दररोज तीस ते चाळीस ट्रक भिवापूर मार्गे ये-जा करीत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे १४ चाकी ट्रकमधूनही वाळूचोरी सुरू आहे.
वाळू तस्करीच्या बाबतीत पोलीस आणि महसूल विभागाच्या टार्गेटवर टिप्पर असतात. यापूर्वी शेकडो टिप्परवर कारवाई करण्यात आली व आताही सुरूच आहे. त्यामुळे टिप्परने वाळूची चोरटी वाहतूक करणे जोखमीचे झाले आहे. त्यापेक्षा वेगळी स्थिती ट्रकबाबत (एलपी) आहे. मालवाहू वाहन म्हणून ट्रककडे पहिले जाते. पोलीस किंवा महसूल विभागाचे कर्मचारी सहसा ट्रक थांबवून तपासणी करीत नाहीत.
त्याचा लाभ घेत वर्धा, अमरावती जिल्ह्यात १२,१४, १६ व १८ चाकांच्या ट्रकद्वारे मोठ्या प्रमाणात वाळू भरून नेली जात असल्याची माहिती आहे. टिप्प च्या तुलनेत ट्रकमध्ये अधिक वाळू वाहून नेता येत असल्याने सुद्धा वाळू तस्करांना ट्रक सोयीचे ठरत आहेत.
भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामधून नीलज, भिसी मार्गे तसेच भिवापूर आणि भिवापूर तालुक्यातील उखळी, नांद मार्गे वाळू पुढे नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात नेली जाते. नीलज फाटा आणि भिवापूर येथे गौण खनिज तपासणी नाके आहेत. परंतु ते कुचकामी ठरले असून या मार्गाने वाळूची चोरटी वाहतूक जोरात सुरु आहे
मोठ्या ट्रकवर अद्याप कारवाई नाही
टिप्पर सोबतच ट्रकने मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक केली जाते. मात्र, येथील पोलीस व महसूल विभागाकडून ट्रकवर कारवाई केल्याची नोंद नाही. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी पहिल्यांदाच कुही फाटा येथे एका ट्रकवर कारवाई केल्याचे समजले
रात्रीला बिनधास्त धावतात वाळूचे ट्रक
बंद झालेल्या वाळू वाहतुकीने अचानक जोर धरला आहे. रात्रीला चोरीची वाळू भरलेली वाहने रस्त्याने बिनधास्त धावताना दिसतात. वस्तूत: पोलीस व महसूल विभागाच्या आशीर्वादाशिवाय अवैध वाळू वाहतूक सुरु होणे शक्य नाही. त्यामुळे सुरु असलेल्या वाळू वाहतुकीला वरील दोन्ही विभागाकडून हिरवी झेंडी मिळाली असावी, असा कयास लावण्यात येत आहे.
