महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी धडक कारवाई सुरू केली आहे. जप्ती पथकाने स्वामिनारायण सोसायटीतील घर सील करीत गुरुवारी (ता. १५) नळ कनेक्शनही बंद केले. नागरिकांनी थकबाकीसह मालमत्ता कर व पाणीपट्टी भरून कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले.
मनपाच्या आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथकाकडून मालमत्ता करवसुलीच्या कार्यवाहीला गती देण्यात आली आहे.
दोन दिवसांत पाचपेक्षा जास्त थकबाकीदारांची दुकाने सील करण्यात आली. स्वामिनारायण सोसायटीतील युवराज पीतांबर चौधरी यांच्या घराला सील लावण्यात आले. तसेच नळ कनेक्शन बंद करण्यात आले.
त्यांच्याकडे एक लाख ११ हजार ८३ रुपयांची थकबाकी आहे. ते थकबाकी भरण्याच्या नोटिसांना प्रतिसाद देत नव्हते.
त्यामुळे वसुली अधीक्षक शिरीष जाधव, निरीक्षक मधुकर वडनेरे, अनिल सुडके, राजेंद्र गवळी, रवींद्र देवकर, जगदीश पांडे, संजय सैंदाणे, अशोक मंगीडकर, याकूब पठाण, हेमंत खैरनार, किशोर वाघ, किशोर बागूल, यतीन तेलंग, सचिन पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.