चोपडा साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवत असलेल्या बारामती ॲग्रो युनिट ४ ने २०२३-२४ च्या गळीत हंगामासाठी उसाला प्रतिटन २६०० रुपयांचा भाव जाहीर केला असून, खानदेशात सर्वांत जास्त भाव असल्याचे बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यंदाच्या हंगामाच्या सुरवातीला २३०० रुपये उसाला भाव देण्यात आला होता. परंतु त्यात ३०० रुपयांची वाढ करण्यात आली असल्याचे गुळवे यांनी सांगितले
वाढीव तीनशे रुपयांपैकी १५० रुपये हे गाळप हंगाम संपल्यावर तर उर्वरित १५० रुपये हे दिवाळीच्या वेळेस ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तर यंदाचा गळीत हंगाम १६ फेब्रुवारीपासून बंद होणार आहे.
तरी ज्या शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक असेल त्यांनी त्वरित कारखाना साईटवर ऊस आणावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सुभाष गुळवे म्हणाले, की यंदा २०२३-२४ चा हंगामात फक्त १ लाख ६ हजार टन उसाचे क्रशिंग झाले असून, कारखाना तोट्यात सुरू आहे.
अरुणभाई गुजराथी यांच्या आग्रहाखातर हा कारखाना भाड्याने घेतला असून, ‘बारामती ॲग्रो’चे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी गुजराथी यांना दिलेला शब्द पाळत आहेत. कारखाना करारानुसार चालत आहे. त्यामुळेच ‘बारामती ॲग्रो’ने आतापर्यंत ६० कोटीपेक्षा जास्त खर्च केला आहे.
काही जणांकडून राजकारण
सुभाष गुळवे यांनी सांगितले, की ‘बारामती ॲग्रो’ने आतापर्यंत ६० कोटींपेक्षा जास्त खर्च केला आहे. देखील येथील काही संचालक वैयक्तिक हितासाठी चोपडा साखर कारखान्याला विरोध करीत आहेत.
जाणीवपूर्वक राजकारण करीत आहेत. कारखाना चालायला नको अशीच त्यांची भूमिका आहे. त्या संचालकांना शेतकऱ्यांशी घेणे देणे नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या भूमिकेकडे लक्ष देत नाही.
