जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी जुलै-२०२३ पासून मिशन उत्कर्ष हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सातत्याने जिल्हास्तरावरून पाठपुरावा केला जात होता. ३१ मार्च २०२४ पर्यंत विद्यार्थ्यांच्या सध्याच्या स्तरावरून वाढ करून त्यांना असर स्तरापर्यंत पोचविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी अभिनव गोयल व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांनी वडणे (ता. धुळे) येथील जिल्हा परिषद शाळेस ११ जानेवारीला भेट दिली होती.
त्या वेळी तेथील प्रभारी मुख्याध्यापक मिलिंद चौधरी यांना अध्ययन प्रणालीबाबत विचारणा केली असता काहीच माहिती देता आली नाही. याबाबत श्री. चौधरी यांना शिक्षण विभागातर्फे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली
सादरीकरणासही अनुपस्थित
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाढीसाठी विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चित केले आहे का? अध्ययनस्तर वाढीसाठी कोणकोणत्या उपाययोजना, उपक्रम राबविण्यात आले याबाबत २० फेब्रुवारी २०२४ ला मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांच्या दालनात सकाळी दहाला सादरीकरणासाठी बोलविण्यात आले
मात्र, श्री. चौधरी सादरीकरणासाठी अनुपस्थित राहिले. त्यांची ही कृती पाहता श्री. चौधरी यांनी वरिष्ठांच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वरिष्ठांचा अवमान केला. तसेच शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी दुर्लक्ष केल्याने मिलिंद चौधरी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांनी निलंबित केले.
...तर इतरांवरही कारवाई
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात असताना काही शिक्षक हलगर्जी करीत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
