शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने पीककर्ज; 10 एप्रिलपासून मिळणार लाभ

फुले शाहू आंबेडकर
0
येत्या खरीप हंगामासाठी धुळे- नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेतर्फे पीक कर्जात शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराची सवलत दिली जाणार आहे. दोन्ही जिल्ह्यातील लाखावर शेतकऱ्यांना दहा एप्रिलपासून हा लाभ दिला जाणार आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०२४- २०२५ या कालावधीत नवीन पीक कर्ज वाटपाची मंजुरी घेत वाटपाच्या तयारीला वेग दिला आहे
तसेच ३० मार्च २०२४ पूर्वी पीक कर्ज परतफेडीचे आवाहन बँकेने केले आहे. दोन्ही जिल्ह्यातील प्राथमिक विविध कार्यकारी, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सभासदांना, बँकेमार्फत वैयक्तिक पीक कर्ज घेणाऱ्या सर्व सभासद, सर्वसामान्य सभासदांना बँकेतर्फे नवीन पीक कर्जाबाबत माहिती दिली जात आहे.

यात येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने पीक कर्जावर शून्य टक्के दराने व्याज सवलत देण्याचे निश्चित केले आहे. तसेच दहा एप्रिलपासून नवीन पीक कर्ज वाटप करण्याविषयी धोरणात्मक निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
मंजूर दरानुसार वाटप
धुळे आणि नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय तांत्रिक समितीची सभा झाली. तीत पीक कर्ज दरास मंजुरी देण्यात आली. यामध्ये प्रति हेक्टरी स्केल : कापसाला ८० हजार, केळीला १ लाख २६ हजार, पपईला १ लाख २० हजार. नाबार्डच्या धोरणाप्रमाणे बँक पशुसंवर्धन
दुग्ध व्यवसाय व मच्छामारीसाठीच्या नवीन पर्सनलाईज्ड एटीएम डेबीट कार्डद्वारे जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने निश्चीत केलेल्या पीक कर्ज दरानुसार कर्ज वाटप करणार आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या निर्णयानुसार बँक कृषीपुरक उद्योगासाठी वैयक्तीक व सहकारी संस्थामार्फत २०२४- २०२५ च्या पीक कर्ज वाटप रक्कमेच्या ७५ टक्के रक्कम कन्झम्शन कर्ज म्हणून देण्यात येणार आहे.
कर्ज भरणाचे आवाहन
राज्य शासनाने घोषित केल्याप्रमाणे तीन लाखांपर्यंतचे कर्ज वितरित होणार आहे. ‘प्रथम कर्ज भरणा, प्रथम नवीन कर्ज प्राप्ती’ या धोरणानुसार कर्ज वाटप होणार आहे. ३० मार्चपर्यंत भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना (थकीत अधिक चालू) दहा एप्रिलपासून पीक कर्ज वाटप होणार आहे. संपूर्ण कर्जवाटप नवीन पर्सनलाईज्ड एटीएम डेबीट कार्डद्वारे कर्ज वितरण होणार आहे.

कर्जदार शेतकरी सभासदांनी ३० मार्चपर्यंत मागील वर्षाच्या पीक कर्जाची परतफेड ही बँक धोरणाप्रमाणे फक्त घेतलेल्या मुद्दल रकमेची तत्काळ परतफेड करावी, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, उपाध्यक्ष दीपक पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, सरव्यवस्थापक अे. एम. सिसोदे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default