इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची २१ फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू झाली असून, भाषा विषयाच्या पेपरला कोणीही कॉपी करताना सापडले नाही. परीक्षा कॉपीमुक्त व्हावी म्हणून महसूल व जिल्हा परिषदेची एकूण ४६ भरारी पथके नेमली आहेत. जिल्ह्यात बारावीची १६ संवेदनशील केंद्रे असून प्रत्येक केंद्रावर विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडताना त्यांची अंगझडती घेतली जाते. तरीपण, न दिसेल अशा ठिकाणी अनेकजण कॉपी लपवितात. त्याचा भरारी पथकांकडून शोध घेतला जातो. गुरुवारी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा रसायनशास्त्र विषयाचा पेपर होता.
जिल्ह्यातील २९ हजार १६४ पैकी २८४ विद्यार्थी विविध कारणांमुळे परीक्षेला उपस्थित राहू शकले नाहीत. २८ हजार ८८० विद्यार्थ्यांमध्ये दोनजण कॉपी करताना पकडले गेले. उद्यापासून (शुक्रवार) दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होत असून, जिल्ह्यातील १८२ केंद्रांवर ६५ हजार ७४९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांनी गैरप्रकार न करता आत्मविश्वासाने भयमुक्त वातावरणात पेपर लिहावा, असे आवाहन माध्यमिक शिक्षण विभागाने केले आहे.
‘स्कॉड मॅडम’कडून पहिली कारवाई
मंगळवेढा, माळशिरस व कुर्डुवाडी या तालुक्यांतील प्रत्ये
की एका विद्यार्थ्यावर कॉपीप्रकरणी भरारी पथकाने कारवाई केली आहे. त्यांचा अहवाल बोर्डाला पाठवून देण्यात आला आहे. ‘स्कॉड मॅडम’ म्हणून ओळख असलेल्या उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांनी दोन विद्यार्थ्यांवर कॉपीप्रकरणी कारवाई केली आहे. गोंदिया या ठिकाणी कार्यरत असताना त्यांनी इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेवेळी एकाच वर्षी ६५ विद्यार्थ्यांवर कारवाई केली होती. चिटणिसाची कार्यपद्धती व रसायनशास्त्र या पेपरवेळी त्यांनी दोन कारवाया केल्या. या परीक्षेत बुधवारी जिल्ह्यातील पहिली कॉपी केस त्यांनीच केली.
